दहशतवादविरोधात मोर्च्यात जळत्या मशाली उलटल्या, आगीत 50 हून अधिक जण भाजले

मध्य प्रदेशात दहशतवादविरोधी मोर्च्यादरम्यान खळबळजनक घटना घडली आहे. खंडवा येथे हातात मशाल घेऊन मोर्चा काढत असताना अपघात झाला. राष्ट्रभक्त वीर युवा मंचतर्फे मशाल मोर्चा काढण्यात आला होता. मोर्च्याच्या समारोपावेळी मशाल ठेवत असताना काही मशाल उलटल्या आणि आग लागली. या अपघातात 50 हून अधिक जण भाजले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीच्या घटनेनंतर लोकांनी बचावासाठी धावाधाव सुरू केल्याने घटनास्थळी चेंगराचेंगरीही झाली. मोर्च्यात एक हजाराहून अधिक मशाली होत्या. त्यापैकी 200 मशाली पेटवण्यात आल्या होत्या. मशालींमध्ये लाकडाचा भुसा आणि कापूर पावडर होती, त्यामुळे आग आणखीनच भडकली.

दहशतवादाविरोधात आयोजित कार्यक्रमात तेलंगणाचे भाजप नेते टी राजा आणि पश्चिम बंगाल भाजपच्या प्रवक्त्या नाझिया खान सहभागी झाले होते. तर हिंदू नेते अशोक पालीवाल कार्यक्रमाचे नेतृत्व करत होते. समारोप समारंभ सुरू असताना अपघात झाला. अपघातानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले.

खांडव्यातील बदबम चौकात गुरुवारी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमापूर्वी रात्री अकराच्या सुमारास अर्धा तास मशाल मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सुमारे 1000 मशाली प्रज्वलित करण्याचा कार्यक्रम झाला. मात्र केवळ 200 मशाली पेटवण्यात आल्या. समारोपाच्या वेळी घंटाघर चौकात लोकांनी मशाली पेटवण्यास सुरुवात केली. यावेळी अचानक काही मशाली उलटल्या आणि आग लागली. अचानक आग वाढल्याने लोक होरपळायला लागले. अपघातानंतर गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. यानंतर अथक प्रयत्नाने आग विझवण्यात आली. अपघातात 50 जण जखमी झाले. सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यापैकी 30 जणांवर रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले असून अन्य 12 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.