सावकारी विरोधात आणखी एक गुन्हा, दोन लाखाची जबरदस्तीने नोटरी करून फसवणूक

रत्नागिरी शहर व तालुक्यातील सावकारी व्यवसायाची पाळेमुळे खणून काढण्याची पोलिसांनी सुरवात केली आहे. एका सावकाराविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 लाखांचे उसने हाती घेतले अशी जबरदस्तीने नोटरी करून फसवणूक व ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

परवाना नसताना 2 लाखांची जबरदस्तीने नोटरी करुन फसवणूक करुन मुलगा व वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना पुढे आली आहे. ही घटना मार्च 2023 ते 2 जानेवारी 2024 या कालावधीत तालुक्यातील करबुडे येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजन सुरेश सागवेकर यांनी संशयित सर्वेश विजय पाटील (रा. मिरजोळे-पाटील वाडी, रत्नागिरी) यांच्याकडून मार्च 2023 दुपारी साडेतीन या कालावधीत सागवेकर यांची आई सुप्रिया हिच्या उपचाराकरिता संशयित सर्वेश पाटील यांच्याकडे सावकारी परवाना नसताना फिर्यादी सागवेकर यांची दुचाकी गॅरेटी म्हणून ठेऊन घेऊन 38 हजार दहा टक्के महिना व्याजाने घेतले होते.

त्या बदल्यात संशयित सर्वेश याने व्याजासहित 1 लाख रुपये त्यानंतर व्याजासहीत दीड लाख अशी वारंवार मागणी केली. फिर्यादी सुजन सागवेकर यांनी पैसे दिलेले नाहीत म्हणून संशयित सर्वेश पाटील याने सागवेकर यांच्या वडिलांच्या नावे 2 लाखाची नोटरी करुन फिर्यादी सागवेकर यांची फसवणूक केली. तसेच वारंवार ज्यादा पैशाची मागणीचा तगादा लावून पैसे दिले नाहीतर तुला व तुझ्या वडिलांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. या प्रकरणी सुजन सागवेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.