>> प्रा. मोहन कोलते
मूलभूत मानवी भावनांच्या परिघात केलेली मनसोक्त मुशाफिरी असंच ‘जावयाची मुंडी’ या सुरेश पाटील यांच्या कथासंग्रहाबाबत म्हणावे लागेल. दुःख, आनंद, राग, भीती, प्रेम अशा महत्त्वाच्या मानवी भावनात्मक व्यवहारांची अभिव्यक्ती असलेला व सूक्ष्म निरीक्षणाचा अंगीकार केलेला हा कथासंग्रह ‘मनोगता’पासूनच लक्षवेधी ठरतो. स्वतंत्र शैली, मांडणीतील नाविन्य, विषयांतील वेगळेपण, वाचनीयता व अतिशय चित्रदर्शीपणे केलेली मांडणी ही या कथासंग्रहाची विशेष वैशिष्टय़े म्हणावी लागतील.
मराठी मुलुखाला सरकारी अधिकाऱयांच्या स्वार्थाची तशी सवय झाली आहे, पण त्या वरवंटय़ाखाली स्व-कुटुंबे कशी भरडली जातात व पोटाच्या लढाईत ज्यांच्याकडे आहे तेही कसे बिघडले आहेत, हे ‘मनोगता’तील विदारक सत्य कथासंग्रहाचा पोत कसा आहे हे दर्शविते. शिवाय याच कथासंग्रहातील ‘साळुंखे महाराजांना फाशी’ किंवा ‘वासलात’ या कथा मनोगताचाच पुढचा अध्याय आहे की काय? असा प्रश्न पडतो.
सर्वच कथा अभ्यासपूर्ण असून त्याला चिंतनाची डूब लाभली आहे. शिवाय लेखकाकडे हुबेहूब प्रसंग उभे करण्याची हातोटी असल्याने कथांमधील घटनांचे आपण साक्षीदार असल्याचा भास सातत्याने होत राहतो. लेखकाचा ग्रामीण जीवनाचा अभ्यासही सखोल असल्याने त्याला मातीचा गंध आहे. तो टवटवीत, तजेलदारपणा ठायी ठायी आढळतो. त्यामुळेच ‘जावयाची मुंडी’ असेल वा ‘जिगर’‘, ‘नातं’ यांसारख्या कथा आपल्या जिव्हाळ्याच्या कधी होतात हे कळतच नाही.
नजरेसमोर पत्नीचा मृत्यू होत असताना नानासाहेबांचे उद्ध्वस्त होत असलेले भावविश्व चितारणारी ‘संगत’ हळुवारपणे हाडामांसात उतरते, तर भुकेने तडफडण्यापेक्षा चोरीला प्राधान्य देणारा ‘सफाई’ कथेचा निष्पाप नायक चोरी करताना पकडला जातो. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शेजारच्या रेवती गोडांबेचे दुःख टचकन टोचते. ‘बाळा, मी आता दूर जाणार’ असे आपल्या चिमुरडय़ा लेकीला सांगणारी मरणासन्न निर्मला व त्यावर “नाही नमा? तू कुथं जायचं नाही’’ हे त्या चिमुरडीचे ‘ठेवलेली!’ या कथेतील बोल अंगावर सर्रकन काटा आणतात. कथेच्या अनुषंगाने येणारं सानुल्यांचे भावविश्वही खिळवून ठेवते. ‘बिस्किट’, ‘पिवळावंती’, ‘ठेवलेली!’ या कथांतील छोटय़ांचे भावनिक जग, त्यांची मानसिकता अचंबित करणारी आहे. ‘पिवळावंती’मध्ये तर एका चिमुरडीच्या अनुषंगाने वाटचाल करणारी कथा अचानक स्त्राr-पुरुष समानतेच्या विचाराकडे झुकते. त्यामध्येच त्या कथेचे नावीन्य दडलेले आहे.
‘जिगर’, ‘आडमार्ग’सारख्या कथांमध्ये आलेली भोरा रेडा, ताली म्हस यांची वर्णने अत्यंत प्रभावी झाली आहेत. हौसा व ताली या म्हशीचे जुळलेले भावबंध मानव आणि प्राण्यांमधील विश्वासाचे द्योतक असून त्याची जातकुळीच वेगळी आहे. दुसऱयांच्या पैशांवर आपला चौसोपी ‘वाडा’ उभारणारे मुरब्बी मुंडे कुटुंब… माणसाची हीच कोडगी वृत्ती आज समाजमन कुठे चालले आहे, याचा आरसा ठरावा. ‘जावयाची मुंडी’ ही कथा या संग्रहाचे विशेष आकर्षण. त्या अनुषंगाने जन्मदात्रीला ठेंगा दाखवून सासूसाठी बकऱयाची मुंडी आणणारा जावई हा घराघरातून घडणाऱया कहाणीवर मार्मिक बोट ठेवतो. ‘पलंग’, ‘फिरता चषक’, ‘झडती’, ‘नातं’सारख्या कथांनाही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. ‘नातं’मधील नामदेव मास्तर व त्याची पत्नी मनातून उतरणे सहज शक्य न होण्यासारखेच आहेत.
वास्तव वर्तमान व त्यावरचे खरमरीत भाष्य ही पाटील यांच्या लेखनाची विशेषता आहे. मानवी भावभावनांचे अत्यंत तरल व संवेदनशील असे अनोखे बंध इथे अनुभवायला मिळतात. कथांचा बाज हा मानवी मनाच्या डोहात उतरून घुसळण करणारा असला तरी स्वार्थ आणि चंगळवादात अडकलेल्या विदारक परिस्थितीवर केलेले भाष्य हे या कथासंग्रहाचे ालस्थान आहे. संतोष घोंगडे यांचे मुखपृष्ठही कथासंग्रहाला यथोचित न्याय देणारे आहे.
जावयाची मुंडी
प्रकाशक ः न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठे ः 258
किंमत ः रु.300/-