भारताचा प्राण हा सगळ्यात वरचा धर्म आहे

धर्म हा भारताचे स्वत्व आहे, प्रचलित धर्म नाही. असे अनेक धर्म आहेत. त्यामागची जी आध्यात्मिकता आहे. सर्व धर्मांच्या वरचा जो धर्म आहे, तो धर्म भारताचा प्राण आहे. ती आपली प्रेरणा आहे. त्यातून आपल्या इतिहासाची जडणघडण झाली आहे. त्यासाठी आपले बलिदान झाले आहे, अशी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मांडली.

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत यांनी धर्म म्हणजे काय? आणि हिंदू धर्म कसा अस्तित्वात आला याविषयी भूमिका स्पष्ट केली. भागवत म्हणाले, ‘स्व काय आहे? आपण कोण आहोत? कुठून आलो? कुठे जायचेय? या आधारावर आपल्या पूर्वजांनी एक सत्य प्राप्त केले. त्या सत्याच्या आधारावर आपली काही मूल्ये तयार झाली. सत्य, करुणा, शुचिता, तपस या चौकटीत जो बसतो तो धर्म आहे, असे भागवत म्हणाले.

आपला इतिहास बघा. तुम्हाला कळेल की भारतात जे कर्तृत्व घडलेय, जो संघर्ष झालाय तो धर्मासाठी झालाय. त्या धर्माचे स्पष्ट स्वरूप आपल्याला लक्षात यायला हवे. आपण कोण आहोत? आपण म्हणत असतो की आपण सगळे हिंदू आहोत. आम्ही स्वतःला हिंदू म्हणतो कारण हा धर्म सार्वभौम, शाश्वत आणि या ब्रम्हांडासोबत अस्तित्वात आला आहे. हा धर्म शोधला नाही आणि कोणाला दिलाही नाही म्हणून आपण त्याला हिंदू म्हणतो, जो मानवता आणि जगाचा धर्म आहे, असे भागवत म्हणाले.

बांगलादेशी हिंदूंना मदतीची गरज

भारत-बांगलादेशात संबंध बिघडवण्याचे, पाकिस्तानला सोबत घेण्याचे प्रयत्न काही शक्तीमार्फत केले जातात. यामागच्या शक्ती ओळखा, भारत मोठा झाला तर आपले देशविघातक उद्योग थांबतील ही भीती त्यांना आहे. सांस्कृतिक परंपरांच्या विरुद्ध हा विचार असल्याने ते उद्ध्वस्त करणे हेच त्यांचे ध्येय आहे. बांगलादेशी हिंदूंना आज मदतीची गरज असल्याचे मोहन भागवत म्हणाले.