ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला हिंदुस्थानी संघ ज्या खेळाडूची आतुरतेने वाट पाहतोय तो मोहम्मद शमी बंगालसाठी धावून आला आणि त्याच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर त्याने बंगालला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवून दिले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात बंगालने चंदीगडचा अवघ्या 3 धावांनी पराभव केला. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना बलाढ्य बडोद्याशी झुंजावे लागणार आहे. तसेच दुसऱ्या उपउपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेशने आंध्रचा 5 विकेट आणि सहा चेंडू राखून पराभव केला. त्यांची लढत दिल्लीशी होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड कसोटीत मात खाल्ल्यामुळे हिंदुस्थानी संघाला मोहम्मद शमीची आठवण येऊ लागलीय. मात्र तो अद्याप शंभर टक्के फिट नसून त्याच्या फिटनेसवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती खुद्द रोहित शर्माने दिली होती. त्यामुळे शमीचे पुनरागमन लांबणीवर पडल्याचे संकेत मिळाले होते. मात्र आज शमीने गोलंदाजीसह फलंदाजीचीही कमाल दाखवत आपल्या फिटनेसचे दाखले दिले. परिणामतः बॉक्सिंग डे कसोटीत तो हिंदुस्थानी ताफ्यात दाखल होण्याची शक्यता वाढली आहे. गेले 13 महिने शमी दुखापतीमुळे हिंदुस्थानी संघाबाहेर असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली जात होती. मात्र तिसऱ्या कसोटीतही शमीच्या खेळण्याची शक्यता नसली तरी तो आता कोणत्याही क्षणी हिंदुस्थानी संघात दिसू शकतो.
घोषने विजय खेचून आणला
आघाडीवीरांनी छोट्या-छोट्या खेळ्या करत चंदीगढचा धावफलक हलता ठेवला होता. आघाडीच्या मनन वोरा (23), शिवम भंडारी (14), अमृत लुबाना (14), राज बावा (32), प्रदीप यादव (27) आणि निखिल शर्मा (22) यांनी दोन अंकी धावा काढत संघाची मजल शंभरीपलीकडे नेली होती; पण दुसरीकडे सयन घोषने आघाडीच्या फलंदाजांना बाद करत सामना थरारक वळणावर नेला.
निखिल शर्माने शेवटच्या दोन षटकांत 23 धावांची गरज असताना दोन षटकार खेचत सामना चंदीगढच्या बाजूने खेचला होता. 19 वे षटक शमीनेच फेकले आणि त्यात 12 धावा काढल्यामुळे बंगाल काहीसा अडचणीतही आला. तेव्हा शेवटच्या षटकात 11 धावा हव्या होत्या आणि सयन घोषने पहिल्या पाच चेंडूंवर केवळ 3 धावा दिल्या आणि सामना बंगालच्या बाजूने वळवला. शेवटच्या चेंडूवर आठ धावांची गरज होती आणि निशंक बिर्लाने चौकार ठोकला. घोषने आपल्या चार षटकांत 30 धावा देत महत्त्वाचे 4 फलंदाज बाद करत बंगालला निसटता विजय मिळवून दिला. तोच सामनावीर ठरला.
शमीच्या झंझावातामुळे बंगालची मजल 159 धावांपर्यंत
जगजीत सिंगच्या माऱ्यापुढे बंगालची एकवेळ 8 बाद 114 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. बंगालचा संघ 125 धावांपर्यंत पोहोचण्याचीही शक्यता कमी होती. तेव्हा मोहम्मद शमी बंगालच्या मदतीसाठी बॅट घेऊन धावून आला. त्याने आपल्या 17 चेंडूंच्या खेळीत 2 षटकार आणि 3 चौकार ठोकत बंगालला अनपेक्षितपणे 159 धावांपर्यंत नेले. शमीचा हाच झंझावात बंगालला विजय मिळवून देणारा ठरला. शमीच्या आधी करण लाल (33), वृत्तिक चॅटर्जी (28), प्रदीप प्रामाणिक (30) यांनी संघासाठी धावा गोळा केल्या होत्या.