भाविकांचे शेकडो मोबाईल लंपास, विसर्जन मिरवणुकीत चोरांची हातसफाई

mobile

लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी भाविकांची लालबाग-परळ आणि गिरगाव चौपाटीवर गर्दी उसळली होती. भाविक बाप्पांचे दर्शन घेण्यात तल्लीन झाले असताना मोबाईल चोरांनी तीच संधी साधली. चोरांनी गर्दीचा गैरफायदा उचलत शेकडो मोबाईल लांबवले. मोबाईल हरवले अथवा चोरीला गेल्याच्या तक्रारी येतच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

लालबाग-परळसह गिरगाव चौपाटीवर भक्तांचा जनसागर उसळला होता. जो तो बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आणि बाप्पांना मनसोक्त याचि देही याचि डोळा पाहण्यात मग्न झाला होता. नेमकी हीच संधी मोबाईल चोरांनी साधली. गर्दीत होणाऱ्या रेटारेटीचा फायदा घेत चोरांनी भाविकांच्या खिशातले मोबाईल अलगद काढून नेले. लालबाग-परळ येथील गर्दीत चोरीला गेलेल्या भाविकांची काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी रांग लागली होती. आज उशिरापर्यंत काळाचौकी पोलीस ठाण्यात मोबाईल लंपास झाल्याच्या 60 तक्रारी दाखल झाल्या होत्या.

गिरगाव चौपाटीवरील गर्दीतदेखील अनेक भाविकांचे महागडे मोबाईल चोरीला गेले. संध्याकाळपर्यंत जवळपास 100 मोबाईल चोरीच्या नोंदी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या, तर वि. प. रोड पोलीस ठाण्यात 80 हून अधिक मोबाईल चोरीच्या नोंदी झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी आणखी नागरिक येत असून हा आकडा आणखी वाढेल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

रेल्वे पोलिसांत तक्रार नाही

मोठ्या संख्येने भाविक एकत्र येणार असल्याने रेल्वे पोलिसांनीदेखील विशेष सतर्कता बाळगली होती. भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, चर्नी रोड, मरीन लाईन्स या स्थानकांवर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे चोरांनी या ठिकाणी पाठ फिरवली. परिणामी रेल्वे पोलिसांत मोबाईल चोरीच्या नोंदीच दाखल झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.

हरवलेल्या बालकांना मदतीचा हात

गिरगाव चौपाटीवर भक्तांचा सागर उसळला होता. बाप्पांना निरोप देण्यासाठी अनेकजण कुटुंबकबिल्यासह चौपाटीवर आले होते. या गर्दीत अनेक पालकांची आपल्या पाल्याशी ताटातूट झाली. पण तेथे तैनात पोलिसांनी दोन ते 17 वर्षापर्यंतच्या जवळपास 40 मुलांना मदतीचा हात देत त्यांना पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्याचे काम केले.