महाराष्ट्रात राजकीय विचार आणि संस्कृती लयाला गेली आहे. कितीही फोडाफोडी करा, पण शिवसेना आणि धनुष्यबाण ही शिवसेनाप्रमुखांचीच प्रॉपर्टी आहे, शिंदे कितीही दावा करत असले तरी ती त्यांची नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस व घड्याळ हे फक्त शरद पवारांचे अपत्य आहे, अजित पवारांचे नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिंधे आणि अजित पवारांवर हल्ला चढवला.
राज ठाकरे यांची आज डोंबिवली आणि ठाण्यात जाहीर सभा झाली त्या वेळी ते बोलत होते. याआधी कोणी गद्दारी केली तर ते माना खाली घालून जायचे. पण आताचे गद्दार उजळ माथ्याने आम्ही नाही त्यातले या बाण्याने वावरत आहेत. महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ होत चालला आहे, असे फटकारेही राज ठाकरे यांनी गद्दार मिंध्यांना लगावले.
ठाणे बिल्डरांच्या घशात घातले
ठाणे तलावांचे शहर होते. पण हे तलाव बुजवून ते बिल्डरांच्या घशात घातले. तिथे उभ्या राहिलेल्या इमारतींमधील रहिवाशांना टँकरने पाणी प्यायची वेळ आली आहे. ठाण्याची बजबजपुरी करून टाकली आहे. हे पाप कुणाचे, असा सवालही त्यांनी मिंध्यांना केला.