लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्यास निघालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे इंजिन मतदारांच्या मनातून घसरल्याचे आजच्या निकालानंतर दिसून आले आहे. महायुतीला मतदान करण्याचे आवाहन धुडकावत मनसेच्या मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिल्याचे दिसून येते.
मनसेने 2019 मध्ये 25 मतदारसंघांत विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मनसेला सुमारे 4 लाख 62 हजार मते मिळाली होती. त्यातील सुमारे 1 लाख 23 हजार मते मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपरमध्ये मिळाली होती. त्याखालोखाल दक्षिण-मध्य मुंबईतील अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, शीव-कोळीवाडा, वडाळा, माहीममध्ये 96 हजार 489 मते मिळाली होती. माहीममध्ये तब्बल 42 हजार 690 तर मागाठाणेमध्ये 41 हजार 060 मते मिळाली होती.
या मताधिक्याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फायदा होईल असा भाजपचा अंदाज होता. पण भाजपचा संपूर्ण अंदाज चुकला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे, कल्याणमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी सभा घेतल्या. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले, पण राज ठाकरे यांचे या विजयात फार मोठे योगदान नाही असे चित्र आहे. मात्र मुंबईत महायुतीला मनसेचा कोणताही फायदा झाला नाही हे चित्र स्पष्टपणे दिसून येते.
मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी भाषण केले होते. दक्षिण मुंबईतील शिंदे गटाचे उमेदवार यामिनी जाधव, दक्षिण-मध्य मुंबईतील राहुल शेवाळे आणि उत्तर-पूर्वचे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेत पाठिंब्याची विनंती केली. या उमेदवारांसाठी राज यांची प्रचारसभा झाली नाही, मात्र मनसेचे स्थानिक नेते, कार्यकर्ते प्रचारात उतरले होते. स्वतः राज ठाकरे यांनी उत्तर-पूर्व मुंबईत लोकसभा मतदारसंघातील मनसे शाखांना भेटी दिल्या होत्या, पण त्याचा काही फायदा झाला नाही. दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबईतील मनसेचे इंजिन चालले नाही. किंबहुना मनसेच्या मतदारांनी महायुतीपेक्षा महाविकास आघाडी आणि खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पारडय़ात मते टाकल्याचे दिसून येत आहे. उलट मोदींच्या बाजूने भूमिका घेतल्याने मनसेचे इंजिन मतदारांच्या मनातून उतरले आणि त्याचा फटका मनसेला विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत बसणार, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
मनसेची विश्वासार्हता आणखी घटली
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाव रे तो व्हिडीओ असे सांगत विरोधात प्रचार करणाऱया राज ठाकरे यांनी अचानक भूमिका बदलली आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला यामुळे मनसची आणि राज ठाकरे यांची विश्वासार्हता घटल्याचे दिसून आले आहे.