पराभवाच्या भीतीने गद्दार बांगर बावचळले
दीड वर्षांपासून गद्दारीचा टिळा लावून फिरणाऱया आमदार संतोष बांगर यांनी आतापासूनच पराभवाची धास्ती घेतली आहे. वर्गखोलीच्या भूमिपूजनासाठी गेलेल्या आमदार बांगर यांनी चक्क चिमुकल्यांचीच मतांसाठी मनधरणी केली. दोन दिवस उपाशी राहा, पण आई-बाबाला मलाच मतदान करायला सांगा, अशी लोचट याचना करणारा त्यांचा व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यात लाख येथे जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार संतोष बांगर हे उपस्थित होते. यावेळी आमदार बांगर हा शाळकरी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे हेच विसरले. प्रचाराची जाहीर सभा असल्याच्या थाटात त्यांनी विद्यार्थ्यांना, तुमच्या घरी जर पप्पा आपल्याला इकडे-तिकडे मतदान करायचे आहे असे काही म्हणत असतील तर दोन दिवस जेवण करायचे नाही आणि आई-बाबांनी विचारले का जेवायच नाही. तर त्यांना सांगायचे की, आमदार संतोष बांगरलाच मतदान करायचं म्हणा. तेव्हाचं जेवण करणार नाही तर जेवत नाही असे सांगा, असे आमदार बांगर म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यावर कुणाला मत देणार असे त्यांनी तीनदा विचारले आणि तीनदा विद्यार्थ्यांकडून वदवून घेतले!