मिंधे आमदार संतोष बांगर ‘फोन पे, गुगल पे’मुळे गोत्यात, 24 तासांत खुलासा करा; निवडणूक विभागाचे पत्र

फोन पे करा, गुगल पे करा… काहीही करा, पण बाहेरगावी राहणाऱया मतदारांना मतदानासाठी आणा!’ असे रोख आमिष दाखवणारे गद्दार आमदार संतोष बांगर यांना निवडणूक विभागाने चांगलाच दणका दिला आहे. ‘फोन पे, गुगल पे’ चा 24 तासांत खुलासा करा, असे पत्रच निवडणूक विभागाने आमदार बांगर यांना दिले आहे.

कळमनुरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांसमोर बोलताना आमदार संतोष बांगर यांनी बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना ‘फोन पे करा, गुगल पे करा… काय लागते ते सांगा, गाडय़ा लावा,  काहीही करा, पण मतदानासाठी आणा… असे रोख आमिष दाखवले. बाहेरगावी राहणाऱया मतदारांच्या याद्या दोन दिवसांत देण्याचे फर्मानही त्यांनी कार्यकर्त्यांना सोडले होते. शिवसेनेचे विभागीय नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार बांगर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून निवडणूक आयोग या रोख आमिषावर कारवाई करणार का? असा सवाल केला होता. शिवसेना जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपू पाटील आणि अजित मगर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे रीतसर तक्रार करून आमदार बांगर यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी याची तत्काळ दखल घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा भुते यांना आमदार बांगर यांच्याकडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले.

 

चोराच्या उलट्या बोंबा!

व्हिडीओतील आवाज माझा नाही, मला फोन पे, गुगल पे काय आहे हे माहिती नाही अशी उलटी बोंब गद्दार आमदार संतोष बांगर यांनी ठोकली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी खुलासा करण्याचे पत्र दिल्यानंतर वृत्तवाहिनीशी बोलताना बांगर यांनी हा कांगावा केला. व्हिडीओ माझा असला तरी तो आवाज माझा नाही असेही ते म्हणाले.