गद्दारांचे काय होणार? अवघ्या देशाचे लक्ष! सत्य, न्याय आणि नैतिकतेचा फैसला!!

आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तासच उरले आहेत. निकाल कुणाच्या बाजूने लागणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी नोंदवलेली निरीक्षणे आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडे झालेली सुनावणी याचा विचार करता शिवसेनेशी गद्दारी केलेल्या मिंध्यांचा निक्काल लागेल, असे बोलले जात आहे. 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निकाल जाहीर करायचा आहे. त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता ते निकालपत्राचे वाचन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या निकालाने सत्य, न्याय आणि नैतिकतेचाही फैसला होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांची लवाद म्हणून नेमणूक केली. त्यांनाच या प्रकरणी सुनावणी करून निकाल देण्याचे निर्देशही दिले होते. त्यानुसार नार्वेकर यांनी मुंबईत आणि हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये सुनावणी घेतली. शिवसेनेचे विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू तसेच मिंधे गटातील आमदार भरत गोगावले, दिलीप लांडे आदींची उलटतपासणीही दोन्हीकडील वकिलांनी घेतली.

सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबरपर्यंत निकाल द्यायला सांगितले होते. परंतु नार्वेकर यांच्या विनंतीनंतर आणखी दहा दिवस वाढवून देण्यात आले. आता बुधवारी 10 जानेवारीला ती मुदत संपत आहे. सुनावणी व उलटतपासण्या पूर्ण झाल्यानंतर नार्वेकर यांनी निकालपत्रही तयार केले आहे. ते निकालपत्र कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीतील कायदेतज्ञांकडे पाठवण्यात आले आहे. त्या निकालपत्राचे वाचन बुधवारी केले जाणार असल्याचे सांगितले जाते.

– शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 34 याचिका दाखल.
– याचिका 6 गटांमध्ये विभागून त्यावर 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबर अशी दीर्घकाळ सुनावणी झाली.
– 113 प्रतिवाद्यांची साक्ष नोंदवण्यात आली.
– सुनावणीअंती 2 लाख 11 पानांचा दस्तावेज तयार झाला.
– हिवाळी अधिवेशन समाप्त झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी सर्व कागदपत्रांचा पुन्हा अभ्यास केला.
– सर्व 54 आमदारांसदर्भात एकत्रित निकालपत्र तयार करण्यात आले.

निकालपत्र

– हे निकालपत्र 1 हजार 200 पानांचे आहे.
– याचिकांच्या सहा गटांचे सहा स्वतंत्र निकाल वाचून दाखवले जातील.
– निकालपत्राचे वाचन करताना राहुल नार्वेकर केवळ ठळक मुद्दे अधोरेखित करतील.
– निकालाच्या वेळी याचिकाकर्ते आणि वकिलांना विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात प्रवेश दिला जाईल.
– संपूर्ण निकालाची प्रत शिवसेना आणि मिंधे गटाला दिली जाईल.

सर्वोच्च न्यायालयात 2 फेब्रुवारीला सुनावणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिंधे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर 2 फेब्रुवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्तीच आरोपीला भेटतात… संविधान धोक्यात

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आमदार अपात्रता सुनावणी संदर्भात बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्यात आहे, अशी प्रतिक्रिया दिली. राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक झालेल्या भेटीवरही संजय राऊत यांनी टीका केली. न्यायमूर्तीच आरोपीला बंद दाराआड भेटत असतील तर न्याय कसा मिळणार असा सवाल त्यांनी केला. नार्वेकर अचानक आजारी पडले, अचानक बरे झाले, बरे झाल्यानंतर ताबडतोब मुख्यमंत्र्यांना भेटले, चहापान केले आणि हसत हसत बाहेर पडले, न्याय देणारा न्यायमूर्तीच आरोपीला भेटून चर्चा करतो ही आपली न्यायव्यवस्था आहे आणि म्हणून संविधान धोक्यात आलंय, असे संजय राऊत म्हणाले.