लडाखजवळ चिनी सैन्याकडून क्षेपणास्त्र चाचणी, हिंदुस्थानची चिंता वाढली!

एकीकडे चीन आणि हिंदुस्थानमध्ये शांतता करार सुरू आहे, तर दुसरीकडे कुरघोड्या चीन हिंदुस्थानच्या सीमेजवळ कुरापत करत आहे. चिनी लष्कराने 29 ऑगस्ट रोजी लडाखजवळ क्षेपणास्त्र डागले. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे हिंदुस्थानची चिंता वाढली आहे. शिन्हुआ न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) काराकोरम पठराजवळ पृष्ठभागावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्राची यशस्वी चाचणी केली.

क्षेपणास्त्र चाचणीद्वारे चीन भारताला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. सीमेबाबत हिंदुस्थानच्या मागण्या मान्य करणे चीनसाठी कठीण आहे. मात्र, दोन्ही देश सीमा विवाद सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे फुदान विद्यापीठाचे उपसंचालक लिन मिनवांग यांनी म्हटले.

ब्रह्मोस क्षेपणास्त्रही पाडण्याची ताकद

लिन मिनवांग यांच्या माहितीप्रमाणे हिंदुस्थानच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा धोका लक्षात घेऊन चीनने ही चाचणी घेतल्याचे मानले जात आहे. हे क्षेपणास्त्र पाडण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, हे या चाचणीद्वारे चीन हिंदुस्थानला दाखवू इच्छित आहे. रिपोर्टनुसार, या चाचणीत चिनी लष्कराने सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र यशस्वीपणे पाडले होते. 17,390 फूट उंचीवर चाचणीदरम्यान हे क्षेपणास्त्र पाडण्यात आले.

चिनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीन आणि भारत यांच्यातील सीमा विवाद सोडवण्यासाठी बीजिंगमध्ये 31 वी बैठक सुरू होती. याचदरम्यान ही क्षेपणास्त्र चाचणी त्याच दिवशी घेण्यात आली. बैठकीदरम्यान, दोन्ही देशांमध्ये सुसंवाद आणि शांतता राखण्यासाठी एक करार झाला. मात्र चीनच्या या उद्दामपणामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढू शकतो.