नराधम रिक्षाचालकाच्या तावडीतून सुटकेसाठी अल्पवयीन विद्यार्थिनीची धावत्या रिक्षेतून उडी; कल्याणमधील धक्कादायक घटना

क्लासमधून रिक्षाने घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीकडे तिचा मोबाईल नंबर मागून रिक्षाचालकाने तिची छेड काढल्याने प्रचंड भेदरलेल्या विद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून उडी मारत घराच्या दिशेने धाव घेतली. परंतु त्या लंपट आणि नराधम रिक्षाचालकाने घरापर्यंत तिचा पाठलाग करून तिला शिवीगाळ केली. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात ही घटना घडली. गोपाळ मुदलीयार (25) असे या नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक करून तपास सुरू केला आहे.

कल्याण पूर्व येथे क्लासला गेलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षात बसताच रिक्षाचालक गोपाळ मुदलीयार याने तिच्याशी लगटपणा करण्यास सुरुवात केली. तिच्याकडे मोबाईल नंबरही मागितला. त्याचे हे कृत्य पाहून त्या विद्यार्थिनीने त्याला रिक्षा थांबवण्यास सांगितले. तरीही गोपाळ मुदलीयार याने रिक्षा सुसाट वेगाने पुढे नेली. त्यामुळे घाबरलेल्या त्या विद्यार्थिनीने वेगात असूनही रिक्षातून उडी मारली आणि ती घराच्या दिशेने पळत सुटली. मात्र त्यानंतरही रिक्षाचालकाने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. तिच्या घरापर्यंत जाऊन त्याने शिवीगाळ केली. घाबरलेल्या त्या विद्यार्थिनीने घरी आई-वडिलांना हा प्रकार सांगताच त्यांनी तातडीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधम रिक्षाचालक गोपाळ मुदलीयार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.

स्वप्नाली लाडच्या घटनेची पुनरावृत्ती
विकृत रिक्षाचालकाने ठाण्यातील स्वप्नाली लाड या तरुणीचे अपहरण केल्याची घटना १ ऑगस्ट २०१४ मध्ये घडली होती. रिक्षाचालक चुकीच्या दिशेने रिक्षा पळवत असल्याने भेदरलेल्या स्वप्नालीने धावत्या रिक्षातून उडी मारली. त्यात ती गंभीर जखमी झाल्याने २१ दिवस कोमात होती. अखेर ३४ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर स्वप्नालीची प्रकृती स्थिरावली. मात्र आज कल्याणमधून समोर आलेल्या घटनेनंतर स्वप्नाली लाड प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. कोलशेतमध्ये राहणारी स्वप्नाली लाड ही टीसीए कंपनीत इंजिनीयर पदावर कार्यरत होती. कामावरून घरी परतत असताना तिने कापूरबावडी येथून रिक्षा पकडली. त्यावेळी रिक्षावाला चुकीच्या दिशेने नेत असल्याचे पाहून ती घाबरली. जीवाच्या आकांताने तिने आरडाओरडा केला. मात्र रिक्षावाला थांबत नसल्याचे पाहून तिने चालत्या रिक्षातून उडी मारली. यावेळी स्वप्नालीच्या डोक्याला जबर मार लागला आणि ती कोमात गेली होती. तिला उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान २१ दिवसांनंतर ती कोमातून बाहेर आली. परंतु तब्बेतीत सुधारणा होत नसल्याने तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर ३४ दिवसांनंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला होता.