कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या तिघा भावांकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, दोघांना अटक

कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या तिघा भावांनी एका 15 वर्षाच्या मुलीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही भावांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना शनिवारी अटक केली आहे. तर मोठा भाऊ फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तिघे आरोपी दक्षिण मुंबईत इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग सेंटर चालवतात. या सेंटरमध्ये अंदाजे 35 ते 40 मुली कोचिंगसाठी येतात. पीडित मुलीने 2022 मध्ये या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला होता.

गेली दोन वर्षे तिघेही आरोपी तिला कोचिंगमध्ये लवकर येण्यास आणि कोचिंग संपल्यानंतर तिला उशिरपर्यंत थांबण्यास भाग पाडायचे. तिघेही तिच्यावर वारंवार अत्याचार करायचे.

मुलीच्या वागण्यातील बदल लक्षात आल्याने आईने तिला समुदेशन केंद्रात नेले. समुपदेशकाला मुलीने सर्व घडला प्रकार सांगितला. समुपदेशकाने मुलीच्या आईला याबाबत माहिती दिली. मात्र आई आणि मुलगी पोलीस तक्रार करण्यास नकार दिला.

अखेर शुक्रवारी पीडितेने आईसोबत पोलीस ठाणे गाठत तिघांविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर मोठा भाऊ फरार झाला तर इतर दोन भावांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता आणि लहान मुलांचे संरक्षण यांच्या अंतर्गत विनयभंग, बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि धमकावणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.