मुकबधीर अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार प्रकरण, नराधमास आजन्म कारावास

धाराशिवमध्ये एका मुकबधीर निवासी शाळेतील काळजी वाहकानेच वस्तीगृहातील मुकबधीर अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या माणुसकीला काळीमा फासणार्‍या नराधमास न्यायालयाने आजन्म कारावास व एक लाख दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. ही घटना नोव्हेंबर 2019 मध्ये घडली होती.

20 नोव्हेंबर 2019 रोजी पोलीस व बालकल्याण विभागाच्या वतीने बालहक्क सुरक्षा सप्ताह चालू असताना त्यासाठी निर्माण केलेल्या दामिनी पथकाने एका मुकबधीर निवासी शाळेस व वस्तीग्रहास भेट दिली. यावेळी तेथील इयत्ता 6 वी च्या वर्गातील एका अल्पवयीन मुकबधीर मुलीवर त्या शाळेच्या वस्तीगृहातीलच काळजीवाहकाने लैंगीक अत्याचार केले असल्याचे उघडकीस आले. संबंधीत पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍याने सदर पिडीत मुलीचा विशेष शिक्षिकेची मदत घेवुन तक्रारी जवाब नोंदविला होता. त्या जवाबामध्ये अल्पवयीन मुलीने आरोपी शाहीर नाना आष्टुळ यांने 11 ऑक्टोबर 2019 रोजी स्वंयपाक करणाऱ्या मावशी घरी गेल्या होत्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यासाठी शाळेतील विद्यार्थी त्यांच्या गावी गेले होते. संध्याकाळी 6 वाजता पाऊस सुरु असताना ती वस्तीगृहातील स्वंयपाक घरातील चुलीसमोर शेकत असताना स्वंयपाक घरात तसेच बाथरूम समोर आरोपीने तिच्यावर दोनवेळेस लैंगिक अत्याचार केल्याचे साईनलँग्वेजमध्ये विशेष शिक्षिकेसमोर सांगितले. सदर फिर्यादी जवाबावरून आरोपी शाहीर नाना आष्टुळ (रा. मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापुर) याच्या विरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर दोषारोप पत्रावरून आरोपीच्या विरूध्द गुन्हा सिध्दीसाठी सरकार पक्षाच्यावतीने एकुण 17 साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणातील पिडीता ही मुकबधीर असल्याने न्यायालयात तिची साक्ष नोंदविताना सरकार पक्षातर्फे विशेष शिक्षीका म्हणुन केशर भायगुडे यांनी मदत केली. आरोपीतर्फे विशेष शिक्षिका म्हणुन वाचा उपचार तज्ञ ज्योती दहिफळे यांनी मदत केली. सदर प्रकरणात पिडीतेची न्यायालयात झालेली नैसर्गिक साक्ष, पिडीतेची मैत्रीण व आई यांची पिडीतेच्या सुसंगत साक्ष तसेच वैद्यकीय अधिकारी, विशेष शिक्षीका यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. या प्रकरणाची सुनावणी तत्कालीन अति. सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगताप यांचे समोर झाली. ते सेवानिवृत्त झाल्यामुळे सदर प्रकरणाची अंतिम सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांच्यासमोर झाली. न्यायालयासमोर आलेला साक्षीपुरावा व अति. शासकीय अभियोक्ता सचिन एस. सुर्यवंशी यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन अंजु शेंडे यांनी आरोपी शाहीर नाना आष्टुळ (रा. मोहोळ, ता. मोहोळ) यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाचे कलम 6 नुसार दोषी धरून आरोपीस जन्मठेप म्हणजेच आजन्म कारावास तसेच एक लाख रूपये द्रव्यदंड अशी शिक्षा आज 28 जून रोजी सुनावली. सदरील द्रव्यदंडाची रक्कम आरोपीने न्यायालयात जमा केल्यास सदर रक्कम एक वर्षानंतर किंवा अपीलातील आदेशाच्या नुसार पिडीतेच्या आईस देण्यात यावी असे निकालात नमुद केले आहे. सदर प्रकरणात अभियोग पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सुर्यवंशी यांनी बाजू मांडली.

ज्या कलमाअंतर्गत आरोपीला दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यातील तरतुदीनुसार सदर आरोपीस त्याने उर्वरीत नैसर्गिक आयुष्य हे कारागृहात काढावयाचे आहे. विशेष म्हणजे आरोपीचे लग्न झालेले असुन त्याला पिडीतेच्या वयाच्या मुली असतानाही त्याने सदरचे दुष्कर्म केलेले आहे.

पिडीत मुलगी ही मुकबधीर, इयत्ता 6 वी. ची अल्पवयीन विद्यार्थीनी असल्याने तसेच आरोपी हा तिच्या वस्तीगृहातील काळजीवाहक असल्यामुळे आरोपीने पिडीतेवर केलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत तात्काळ कोणालाही सांगितलेले नव्हते. त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस येण्यास 43 दिवसांचा उशीर झाला होता. जर का पोलीस विभागाच्या दामीनी पथकाने सदर वस्तीगृहावर भेट देऊन इतर विद्यार्थ्यांसोबत पिडीतेकडे चौकशी केली नसती तर सदरचा गुन्हा उघडकीस आला. धाराशिव जिल्ह्यामध्ये समाज कल्याण कार्यालयामार्फत चालविल्या जाणार्‍या अशा प्रकारच्या निवासी शाळेवर विद्यार्थ्यांना समुपदेशन, सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी तसेच वैद्यकीय मदत यासारख्या प्राथमिक गरजा पुरवठा करण्याची व त्याची अंमलबजावणी काळजीपुर्वक होते किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाची आहे असे मत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्यामध्ये नमुद केलेले आहे.