गिरणी कामगारांची रविवारी प्रचार रॅली, महायुतीला सत्तेतून तडीपार करण्याचा निर्धार

महायुती सरकारने गिरणी कामगार व वारसदारांना मुंबईत घरे नाकारून हद्दपार केले. या महायुतीला विधानसभा निवडणुकीत सत्तेतून तडीपार करण्याचा निर्धार गिरणी कामगार व वारसदारांनी केला आहे. याच अनुषंगाने रविवार, 10 नोव्हेंबरला करी रोड येथे महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ प्रचार रॅली काढली जाणार आहे. महाराष्ट्र हायस्कूल मैदानावर दुपारी 3 वाजता गिरणी कामगार एकत्र जमणार आहेत.

मुंबईच्या जमिनी अदानीच्या घशात घालून गिरणी कामगार व वारसांना कायमचे मुंबईतून हद्दपार करू पाहणाऱया महायुतीचा निर्णायक पराभव करणे काळाची गरज आहे. महायुती सरकार फक्त गिरणी कामगारांपुरते नव्हे तर शेतकरी, बेरोजगार, युवक, पंत्राटी व मानधनी कामगार आणि वाढती महागाई या सर्वच आघाडय़ांवर सपशेल नापास झाले आहे. या सरकारला सत्तेतून तडीपार करून पुन्हा स्वाभिमानी महाराष्ट्र घडवूया, असा निर्धार करीत सर्व श्रमिक संघटनेतर्फे रविवारी महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ प्रचार रॅली काढली जाणार आहे.