मोदी की गॅरंटी; दूध आणखी महागणार

प्रातिनिधिक फोटो

मोदी की महागाईची गॅरेंटी प्रत्यक्षात सुरू झाली असून त्याची सुरुवात घराघरात तापणाऱ्या दुधापासून झाली आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने दुधाच्या कॅनवर 12 टक्के जीएसटी लावण्याची शिफारस केली आहे. दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली. सौर कुकरवर 12 टक्के जीएसटी लावण्याला बैठकीत मान्यता देण्यात आली. जीएसटी कलम 73 अंतर्गत जारी केलेल्या नोटिसांना दिलासा देणारा निर्णय बैठकीत झाला आहे. या नोटीसांचे व्याज व दंड माफ करण्याची शिफारस परिषदेत करण्यात आली असल्याचे वित्तमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

बायोमेट्रिक सिस्टम

जीएसटीच्या बनावट पावत्या रोखण्यासाठी देशभरात बायोमेट्रिक सिस्टम लागू करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने ही सिस्टम लागू होईल, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

लहान करदात्यांना दिलासा

लहान करदात्यांची 2024-25 या कालावधीतील जीएसटीआर-4 ची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या अखत्यारीत आणण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. याविषयी राज्य शासनांसोबत चर्चा केली जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले.

प्लॅटफॉर्म तिकीटवर सवलत

रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट, रिटायरिंग रूम, वेटिंग रूम, क्लॉकरूम सेवांवरील जीएसटीत सूट देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या करावर सूट देण्यात आली आहे. शैक्षणिक वसतीगृहांमधील शुल्कावर सवलत दिली जाणार आहे. मात्र कार्टन बॉक्स, फायर स्प्रिंकलरसह सर्व प्रकारच्या स्प्रिंकलर्सवर 12 टक्के जीएसटी लागू असेल.