Microsoft चे सर्व्हर ठप्प; Air India सह जगभरातील एअरलाईन्सना फटका, बँकिंग सेवाही विस्कळीत

मायक्रोसॉफ्टची क्लाउड सेवा शुक्रवारी दुपारी विस्कळीत झाल्यामुळे जगभरातील विमानसेवा आणि बँकसेवा ठप्प झाल्या आहेत. यामुळे भारत आणि अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांतील विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. जगभरातील बँकांपासून एअरलाइन्सपर्यंतच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. एअर इंडिया, इंडिगो, स्पाईसजेट, आकसा या विमान कंपन्यांच्या विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. त्यासोबतच अनेक विमानतळांवरील सेवाही ठप्प झाली.

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या फोर्मवर एक संदेश पिन करण्यात आला आहे. अनेक विंडोज वापरकर्त्यांना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) त्रुटी दिसत आहेत. क्राउडस्ट्राईक अपडेटनंतर ही समस्या येत आहे. यामुळे युजर्स त्रस्त झाले आहेत. मायक्रोसॉफ्टने ही माहिती दिली आहे. या समस्येमुळे लाखो वापरकर्त्यांवर मोठा परिणाम झाला आहे. मोठ्या बँका, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, जीमेल, ॲमेझॉन आणि इतर आपत्कालीन सेवांवरही त्याचा परिणाम होत आहे.

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस हेल्थ स्टेटस अपडेटनुसार, Azure बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमधील बदलामुळे ही समस्या उद्भवली आहे. यामुळे स्टोरेज आणि कॉम्प्युटर रिसोर्सेसमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी कनेक्टिव्हिटी समस्या निर्माण झाली आहे.

या समस्येमुळे मायक्रोसॉफ्ट 365 सर्विसेस प्रभावित झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मायक्रोसॉफ्टसोबत काम करणाऱ्या CrowdStrike ने ही समस्या मान्य केली आहे. CrowdStrike ही सायबर सुरक्षा फर्म आहे. फर्मच्या अभियंत्यांनी समस्या निर्माण करणारा कंटेट शोधून काढला आहे आणि केलेले बदल परत हटवले आहेत.