‘मी रत्नागिरीकर’ सभेत मिंधे गटाने घातलेला धुडगूस म्हणजे हुकुमशाहीच; राष्ट्रवादी कॉंग्रेसची टीका

रत्नागिरी शहरातील खड्डेनय रस्ते आणि शहराचा विकास या विषयावर ‘मी रत्नागिरीकर’ या बॅनरखाली आयोजित केलेली सभा मिंधे गटाने उधळली, त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी जो काही धुडगूस घातला, ती सर्व हुकुमशाहीच आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी केला. रविवारी विवा एक्सुकेटिव्ह या हॉटेलमध्ये मी रत्नागिरीकर या बॅनर खाली एक सभा आयोजित केली होती.

या सभेत रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्ते तसेच शहरातील विकास या विषयावर नागरिक चर्चा करणार होते. मात्र मिंधे गटाने सभेच्या ठिकाणी दादागिरी करत सभा उधळवली. या सर्व प्रकारावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले की, शहरात अनेक समस्या आहेत. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, एसटी स्टॅण्डचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे,आरोग्याचे प्रश्न आहेत या विषयावर जनतेला आपली मते मांडू दिली पाहिजे. त्या दिवशी जो धुडगूस घातला, त्यात काही काळबेरं असावे असे वाटते. नागरिकांना आपली मते मांडायला दिली पाहिजेत. तुम्हाला जर तुमची मते मांडायची असतील तर ती शांतपणे मांडायला हवी होती. धुडगूस घालायची गरज नव्हती. जे काही घडलं ते हुकुमशाही आहे त्याचा आम्ही निषेध करतो. ज्या विजयकुमार जैन आणि मिलिंद कीर यांनी सभा आयोजित केली त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असे कुमार शेट्ये यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक सईद पावसकर उपस्थित होते.