एकही फ्लॅट न विकता म्हाडाने कमावले पावणेसहा कोटी, अर्ज शुल्कातून प्राधिकरणाची बक्कळ कमाई

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळातील 2030 घरांसाठी अर्ज करण्याची आणि अनामत रक्कम भरण्याची मुदत गुरुवारी मध्यरात्रीपासून संपुष्टात आली. सुमारे 1 लाख 13 हजार 577 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. अर्जदारांकडून आकारण्यात येणाऱ्या 500 रुपये विनापरताना (नॉन रिफंडेबल) शुल्काच्या माध्यमातून म्हाडाने तब्बल पावणेसहा कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली.

म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील गोरेगाव पश्चिम, अॅण्टॉप हिल – वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स -मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील 2030 घरांच्या विक्रीसाठी 9 ऑगस्टपासून अर्ज भरणा आणि स्वीकृतीला सुरुवात केली होती. सुरुवातीला ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आणि अनामत रक्कम भरण्याची मुदत 4 सप्टेंबरपर्यंत होती. त्यानंतर ही मुदत 19 सप्टेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत करण्यात आली. म्हाडाला एकूण 1 लाख 34 हजार 350 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1 लाख 13 हजार 577 जणांनी अनामत रकमेसह अर्ज भरले आहेत.

कुठे, किती अर्ज

सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768, उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी सुमारे 47 हजार, अल्प उत्पन्न गटासाठी सुमारे 48 हजार, मध्यम उत्पन्न गटासाठी 11 हजार तर उच्च उत्पन्न गटासाठी सहा हजार अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.