म्हाडा मुंबई मंडळाने गिरणी कामगारांसाठी पनवेल मौजे कोन येथील 2417 सदनिकांच्या काढलेल्या सोडतीतील यशस्वी आणि संपूर्ण विक्री किंमतीचा भरणा केलेल्या सुमारे 585 गिरणी कामगार, वारसांना सदनिका चावी वाटप गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे केले जाणार आहे. गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भाडेतत्त्वावरील सदनिका योजनेतील उर्वरित राहिलेल्या सदनिका गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने गिरणी कामगारांकरिता मौजे कोन येथील 2417 सदनिकांची संगणकीय सोडत 2 डिसेंबर 2016 रोजी काढण्यात आली. एमएमआरडीएतर्फे बांधलेल्या प्रत्येकी 160 चौरस फुटाच्या दोन सदनिका एकत्र करून 320 चौरस फूट चटई क्षेत्रफळ आकारमानाची सदनिका गिरणी कामगारांना मिळणार आहे.