लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत चटके; महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट येणार

दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून, अनेक ठिकाणी पारा चाळीशीवर गेले आहे. येत्या काही दिवसात एप्रिलमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात आणखी तीक्र उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच जनतेला उन्हाचे चटके बसत आहेत.

हिंदुस्थानच्या हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी आज याबाबत माहिती दिली.  साधारण 10 ते 20 दिवस देशाच्या विविध भागात उष्णतेची ही लाट राहिल. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर कर्नाटक, उत्तर झारखंड येथे तीक्र उष्णतेची लाट असेल, असा अंदाज मोहपात्रा यांनी व्यक्त केला.

19 एप्रिल ते 1 जून या काळात देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूका होत आहेत. उन्हाच्या तीव्र चटक्यांमुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यातच उष्णतेची लाट आणखी तीक्र होण्याचा अंदाज आहे.