अमरावतीत मेळघाटातील अनेक गावांमध्ये पाण्याच्या एका थेंबासाठी मारामारी करावी लागत आहे. विहिरी, नद्या, तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे भिस्त टँकरच्या पाण्यावर आहे. पहाटेपासूनच गावकरी टँकरची चातकासाठी वाट पाहतात. टँकर येताच एकच धावाधाव होते. हंडा, कळशी घेऊन सर्वजण विहिरीवर पोहोचतात आणि विहिरीचा तळ खरडून काढण्यासाठी प्रत्येकजण जीवावर उदार होतो. खडीमल गावातील हे भीषण दृश्यच आज समोर आले.
गावात टँकर आल्याची आरोळी ऐकू आली की आदिवासी महिला विहिरीच्या दिशेने धावत सुटतात. टँकरचे पाणी विहिरीत ओतले की महिलांची ते पाणी खेचण्यासाठी जणूकाही स्पर्धाच सुरू होते. हंडाभर पाण्यासाठी विहिरीच्या काठावर उभे राहून या महिला जिवाचा अक्षरशः आटापिटा करून पाणी मिळवतात. तासभर जिवाची बाजी लावून हंडे, कळशी, पत्र्याचे डबे, बादल्या मिळेल त्या साधनाने विहिरीचा तळ खरडला जातो. मेळघाटातील खडीमल या गावातील ही स्थिती आहे.
तीन ते चार किलोमीटरची पायपीट
धरणी आणि चिखलदरा मिळून मेळघाटात सुमारे 325 गावे आहेत. तालुक्याचे ठिकाण असलेली दोन शहरे सोडली तर इतर सर्व लहान-मोठय़ा गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. तब्बल तीन ते चार किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. गावांमध्ये पाणीपुरवठय़ासाठी ठोस उपाययोजना कधी करणार, असा सवाल गावकऱयांनी मिंधे सरकारला केला आहे.
या गावांमध्ये दुष्काळसदृश स्थिती
मेळघाटातील बेला, मोथा, धरमडोह, आकी, बहाद्दरपूर आणि गौलखेडा बाजार या गावांमध्ये खडीमल गावासारखीच परिस्थिती आहे. अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. गावातील विहिरी कोरडय़ा पडल्याने टँकरद्वारे विहिरीत पाणी आणून सोडले जाते, मात्र विहिरी खरडून काढल्यानतंर पुन्हा टँकरची प्रतीक्षा करावी लागते. सरकारला अजूनही येथील गावांमध्ये पाणी पुरवण्याचा सुसह्य मार्ग अद्याप सापडलेला नाही. पाण्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासून मिटलेला नाही.
येथील आदिवासी महिलांची पाणीटंचाईच्या फेऱयातून सुटका कधी – रोहित पवार
निवडणूक प्रचारात महिलांना पैसे वाटण्यात आले त्यावेळी ते पाणी वाटल्याचे पैसे असल्याचा दावा अमरावतीच्या खासदार महोदयांनी केला होता. आज या महिला आणि चिमुकल्यांना पैसे नाही तर पाण्याची गरज आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी मेळघाटातील पाणीटंचाईबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात ‘एक्स’द्वारे संताप व्यक्त केला आहे. खासदार महोदया होळीला या महिलांसोबत फेर धरतात, पण पाणीटंचाईच्या या फेऱयातून त्यांची सुटका करण्यासाठी माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवणार का, असा सवालही त्यांनी नवनीत राणा यांना केला आहे.
खडीमलसारख्या अनेक गावांमध्ये गेल्या 28 वर्षांपासून टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱयांची देयके अडवून ठेवण्यात येत असल्याने अपुरा पाणीपुरवठा केला जातो, असा गावकऱयांचा आरोप आहे. ज्यांनी 2022 मध्ये टँकरने पाणीपुरवठा केला होता, त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही.
पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करू असे आश्वासनांचे गाजर दरवर्षीच दिले जाते, पण गावांतील पाण्याची स्थिती जैसे थेच आहे, असा संताप गावकरी व्यक्त करताना दिसत आहेत.