मेरठमध्ये अनोखी चोरी, धावपट्टीवर उभ्या हेलिकॉप्टरचे पार्ट खोलून नेले, पायलटला बेदम मारहाण

उत्तर प्रदेशमध्ये चोरीचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. मेरठ विमानतळावरील धावपट्टीवर उभ्या हेलिकॉप्टरचे स्पेअर पार्ट खोलून नेण्यात आले. जवळपास 10 ते 15 जणांचा जमाव अचानक आत घुसला आणि त्यांनी एक एक पार्ट खोलून तिथून धूम ठोकली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न पायलटने केला. मात्र त्याला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पायलटने पोलिसात तक्रार दाखल केली, मात्र पुढे कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावा पायलटने केला.

हेलिकॉप्टरचे पायलट कॅप्टन रविंद्र सिंह यांनी मेरठच्या एसएसपी यांना एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी परतापूरच्या धावपट्टीवरून व्हीटी-टीबीबी या हेलिकॉप्टरचे स्पेअर पार्ट खोलून नेल्याची तक्रार केली आहे.

जवळपास तीनच्या सुमारास एका तंत्रज्ञाने मला फोन करून काही लोक हेलिकॉप्टरचे स्पेअर पार्ट खोलून नेत असल्याची माहिती दिली. मी पायलट असल्याने माझ्यावर याची जबाबदारी होती आणि त्यामुळे मी तत्काळ हेलिपॅडकडे धाव घेतली. 10-15 लोक हेलिकॉप्टरचे पार्ट खोलत असल्याचे दिसताच मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी मलाच मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याची माहिती मी तत्काळ परतापूर पोलीस स्थानकाला फोन करून दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि सदर लोकांना पोलीस स्थानकातही घेऊन गेली. ही घटना 10 मे 2023 रोजी घडली होती, असेही कॅप्टन सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.

सदर हेलिकॉप्टरचा मी पायलट असून कंपनीचा सीईओ आणि डायरेक्टरही आहे. याबाबत मी डीजीसीएला 31 ऑगस्ट 2023 रोजी पत्रही लिहिले. त्याची प्रतही सोबत जोडली आहे, असेही कॅप्टन सिंह यांनी पत्रात नमूद केले.

दरम्यान, एसएसपींनी संपूर्ण प्रकरणाची दखल घेत हे प्रकरण ब्रह्मपुरीच्या सीओंकडे सोपवले असून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे मेरठच्या एसएसपी यांनी हेलिकॉप्टरचे पार्ट काढून चोरी झाल्याची कोणतीही घटना झालेली नाही. दोन पार्टनरच्या वादातून ही घटना घडली. ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडल्याचे त्यांनी सांगितले.