मीरा रोड तोडफोड प्रकरणी सहा जणांना पोलीस कोठडी, चौघांची बालसुधारगृहात रवानगी

अयोध्येत आज झालेल्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त काल मीरा रोड येथे काढण्यात आलेल्या श्रीराम पालखी सोहळा आणि मिरवणुकीत दोन गटांत हाणामारी झाली. यात चार तरुण गंभीर तर 20 जण किरकोळ जखमी झाले. समाजकंटकांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या वाहनांचीही तोडफोड केली. याप्रकरणी नयानगर पोलिसांनी आतापर्यंत तेरा समाजकंटकांना अटक केली होती.

सोमवारी या आरोपींना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातील चार आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर अबू शेख या मुख्य आरोपीसह इतर आठ जणांची दोन ते पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मीरा भाईंदर महापालिकेची बुलडोझर कारवाई

या घटनेनंतर मंगळवारी मीरा भाईंदर महापालिकेने विविध भागातील अतिक्रमन केलेल्या दुकानांवर बुलडोजर कारवाई करण्यात आली.

हैदरी चौकात तोडफोड

मीरा रोड आणि भाईंदर शहरात रविवारी विविध ठिकाणी श्रीराम पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास एक मिरवणूक मीरा रोडच्या नयानगर परिसरातील हैदरी चौकातून जात असताना दोन गटांत वाद झाला. त्यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यात हल्लेखोरांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना मारहाण करून वाहनांची तोडफोड केली. यामध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले असून जवळपास वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश होता.

हा प्रकार घडल्यानंतर अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक आयुक्त महेश तरडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले. याप्रकरणी नयानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तेरा समाजकंटकांची उचलबांगडी केली.