ठसा – कमल परदेशी

>> मेधा पालकर

छोटय़ाशा खेडेगावातून उद्योगाला सुरुवात करून जगभर ‘अंबिका मसाला’ ब्रँड पोहोचविणाऱया उद्योजिका कमल परदेशी यांचे नुकतेच निधन झाले.. पुणे जिह्यातल्या दौंड तालुक्यातील खुटबावमध्ये बचत गटातील महिलांना एकत्रित करून ‘अंबिका मसाला’ हा ब्रँड तयार केला. अल्पावधीतच त्यांचा ब्रँड जगभर पोहोचला. छोटय़ाशा खेडेगावातून मसाला कंपनी सुरू करून शेकडो महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. शेतमजूर ते कोटय़वधींची उलाढाल करणाऱया ‘अंबिका मसाला’च्या चेअरमन हा त्यांचा प्रवास अक्षरशः डोळे दिपवणारा ठरला. कमल परदेशी यांनी 2000 साली खुरपणीच्या मिळणाऱया पैशांतून बचत करत ग्रामीण भागातील महिलांना मसाले बनविण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली होती. आज अंबिका मसाल्यांना देशभरातच नाही, तर परदेशातही मोठी मागणी आहे. त्यांचे मसाले पदार्थ सातासमुद्रापार गेले आहेत. कमल परदेशी यांचा प्रवास अत्यंत कष्टाचा राहिला. उद्योग उभारताना अनेक हालअपेष्टा त्यांना सोसाव्या लागल्या, पण त्या मागे हटल्या नाहीत. त्यांच्या उद्योगासाठी कोरोना काळ प्रचंड त्रासदायक ठरला, पण तरीही त्यांनी नेटाने आपले काम सुरूच ठेवले. अनेक गोरगरीब महिलांना त्यांनी उद्योगाच्या माध्यमातून रोजीरोटी दिली. आपल्या व्यवसायातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे त्यांचे ध्येय शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होते. सुरुवातीला कमला यांनी पुण्यातील सरकारी कार्यालयाबाहेर मसाल्यांची विक्री केली. लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्राहक पेठा आणि प्रदर्शनांमधून मसाला विक्री सुरू केली. हळूहळू बिग बाझारमध्ये त्यांचे मसाले विकले जाऊ लागले. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. जर्मनच्या माजी चॅन्सलर अँजेला मार्पेल यांनीही कमला यांच्या कामाचे काwतुक केले. मुंबईमध्ये नाबार्ड बँकेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात मार्पेल आणि कमला यांची भेट झाली होती. आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करून द्या, या कमला यांच्या मागणीनंतर खरोखर काही आठवडय़ांमध्येच अँजेला मार्पेल यांच्या पुढाकाराने जर्मनीमध्ये अंबिका मसाल्यांच्या विक्रीला परवानगी मिळाली आणि विक्री सुरूही झाली. कमला यांचा साधेपणा सर्वांना भावणारा होता. त्यांनी गावातील अनेक महिलांना पक्की घरं बांधून दिली. मात्र त्या स्वतः अगदी साध्या घरात राहत होत्या. त्या रोज घरापासून फॅक्टरीपर्यंत चालतच ये-जा करायच्या.
‘अंबिका’ नावाच्या ब्रँडने प्रचलित झालेला मसाला जगभरात नऊ देशांमध्ये विकला जात आहे. त्यांचे अंबिका मसाले नावाने 32 फ्लेवर मार्पेटमध्ये विकले जात आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत नाबार्डने त्यांना जागतिक आर्थिक शिखर परिषदेतर्फे सन्मानित केले. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते रणरागिणी पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांना 2021 मध्ये आयसीएसआरचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय सावित्री सन्मान असोसिएशन व सेवाश्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.