गिरगावमध्ये गोमती भूवन इमारतीला भीषण आग

गिरगाव चौपाटी येथील गोमती भुवन इमारतीला आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या इमारतीत दोन ते तीन कुटुंबे राहत होती. या रहिवाशांनी आग लागताच इमारतीबाहेर धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र एक वृद्ध इमारतीत अडकला असून आगीवर नियंत्रण मिळवणे रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती पालिकेच्या ‘डी’ वॉर्डकडून देण्यात आली.

गिरगाव चौपाटी येथील रांगणेकर रोड येथे गोमती भुवन ही चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱया आणि चौथ्या मजल्यावर रात्री 9.30 वाजता आगीचा भडका उडाला. या ठिकाणच्या ज्वलनशील साहित्यामुळे ही आग भडकत गेली. यामुळे 10 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-2ची असल्याचे जाहीर केले. आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून आवश्यक साधनसामग्रीसह प्रयत्न करण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
विल्सन कॉलेजजवळील गल्लीत असणाऱया या इमारतीला पालिकेने धोकादायक असल्याचे सांगत नोटीस बजावल्याने दोन ते तीन कुटुंबेच या ठिकाणी राहत होती. आग लागताच या सर्वांनी इमारतीबाहेर धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र एक वृद्ध इमारतीत अडकला होता, अशी माहिती शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ यांनी दिली.