बाप्पा पावला… आजपासून वांद्रे-मडगाव एक्प्रेस धावणार, बोरिवली रेल्वे स्थानकातून हिरवा झेंडा दाखवून सुरुवात

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला असून 29 ऑगस्टपासून मडगाव-वांद्रे टर्मिनस मडगाव ही एक्स्प्रेस धावणार आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी बोरिवली रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाने पश्चिम रेल्वेला वांद्रे-मडगाव ही एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली होती. ही ट्रेन आठवडय़ातून दोन वेळा धावणार असून पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली, वसई, विरार येथील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी ही एक्स्प्रेस अत्यंत सोयीची ठरणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रथमच वसई-पनवेल या कॉरीडॉरचा वापर करून वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस सुरू करत आहे.

गुरुवारी दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

वांद्रे टर्मिनसवरून ही एक्स्प्रेस सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. ती गोव्यातील मडगावमध्ये रात्री 10 वाजता पोहोचेल. मडगाववरून पुन्हा वांद्रे टर्मिनसला जाण्यासाठी एक्स्प्रेस सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी सुटेल, तर वांद्रे टर्मिनसला रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल.

येथे थांबा असेल

या एक्स्प्रेसला बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी या रेल्वे स्थानकांवर थांबा असेल.

10 वर्षांत राज्यभरात 1258 किलोमीटरचे मल्टी ट्रकिंग, नव्या मार्गांचे काम पूर्ण करण्यात आल्याचे रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी म्हटले आहे. 2024-25 च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 15,940 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. महाराष्ट्रातील तब्बल 128 रेल्वे स्थानके अमृत स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. पश्चिम उपनगरवासीयांना कोकणात जाणे सुलभ व्हावे यासाठी मडगाव एक्स्प्रेस सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.