मराठवाड्यात मुक्तिसंग्राम दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठवाड्याच्या विकासासाठी 46 हजार कोटींच्या विकास कामांची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी 29 हजार कोटींची कामे पूर्णत्वाकडे जात आहे. असे म्हणताच उपस्थितांमधून मुख्यमंत्री धादांत खोटे बोलत असल्याची प्रतिक्रिया उमटली.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा मुक्ती स्तंभाच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी हुतात्मा मुक्तीसंग्राम स्तंभाला पुष्पचक़ अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हवेत तीन फेरी झाडून हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी हजारो तरूणांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या संघर्षामुळेच मराठवाडा मुक्त झाला. देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी राज्यातील युती सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी मागील वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत 45 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये 29 निर्णय आणि 26 घोषणा करण्यात आल्या. त्यातील 29 हजार कोटींची कामे पूर्णत्वाकडे जात आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी करताच उपस्थितांमधून मुख्यमंत्री धादांत खोटे बोलत असल्याचे प्रतिक्रिया उमटल्या. वर्षभरात मराठवाड्याला एक खडकूही मिळालेला नाही. एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. मराठवाड्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकायला मिळाली.
46 रुपयांच्या केलेल्या कामाची तरी माहिती द्या, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आव्हान
मराठवाड्यासाठी 46 हजार कोटींच्या केलेल्या घोषणांपैकी किमान 46 रुपयांच्या केलेल्या कामाची तरी मुख्यमंत्र्यांनी माहिती द्यावी. मी आव्हान देऊन एक लाख रुपयांचे बक्षीस जाहिर करतो, त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या घोषणांवर गत एका वर्षात कोणते कामे पूर्ण झाली त्याची सत्य माहिती मराठवाड्यातील जनतेसमोर मांडावी. आज मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी 29 हजार कोटींचे कामे पूर्णत्वाकडे असल्याचे सूतोवाच केले. मुख्यमंत्री स्वातंत्र्यसंग्रामाच्या या शुभप्रसंगी सर्रास खोटे बोलले असून मराठवाड्यात मागील एका वर्षात 46 रुपयांचेही कामे झाले नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.