Maratha Reservation नगरमध्ये मनोज जरांगे यांची रॅली, शहरात तुफान प्रतिसाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज (12 ऑगस्ट) नगर शहरात आली. यावेळी मोठ्या उत्साहात स्वागत यावेळी चौकाचौकामध्ये करण्यात आले, नगर शहरांमध्ये अनेक रस्ते चक्काजाम झाले होते. नगर शहरामध्ये सर्व ठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले होते.

केडगाव येथे नगर शहरात रॅलीचे स्वागत झाले. नंतर माळीवाडा बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरात रॅली ला सुरुवात झाली . शहरात सुमारे साडेसहा किमीचे अंतर कापत चौपाटी कारंजा येथे सांगता होणार आहे. दरम्यान, सुमारे पाच हजार स्वयंसेवकांचे नियोजन करण्यात आले.

नगर शहराच्या चौकाचौकात मोठ्या उत्साहामध्ये नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. नगरच्या नेत्यांसोबत चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड तसेच माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे मुन्ना भिंगारदिवे यांच्यासह माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी या रॅलीचे स्वागत केले.

असा होता रॅलीचा मार्ग (सर्व फोटो: राजू खरपुडे, नगर)

केडगाव येथे स्वागत – कायनेटिक चौक – सक्कर चौक – माळीवाडा बसस्थानक – मार्केट यार्ड चौक – माळीवाडा वेस – पंचपीर चावडी – आशा टॉकीज चौक – माणिक चौक – कापड बाजार – तेलीखुंट – चितळे रोड मार्गे – चौपाटी कारंजा (समारोप) झाला.

सुमारे चारशे चारचाकी व एक हजार दुचाकी त्यांच्या यात्रेत सहभागी होतील. नगरकडे येताना सुपा येथेही स्वागत झाले व तेथून केडगाव येथे स्वागत करण्यात आले. याठिकाणी पाणी व फूड पॅकेटची व्यवस्था करण्यात येत आहे. ज्यांना सेवा, सुविधा पुरवायची आहे, त्यांनी रॅली मार्गावर पुरवावी, असे आवाहन अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला.