मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटीलांचे जालन्यात जंगी स्वागत

आज जालना शहरात मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात आज जालना शहरात येण्यासाठी जरांगे-पाटील हे अंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर जालन्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. जागो-जागी जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करीत क्विंटलच्या क्विंटल फुलांचे हार घालून स्वागत करण्यात आले आहे.

जालना शहरात एन्ट्री होताच त्यांचे जालन्यातील संभाजी उद्यान परिसरात संभाजी महाराज यांच्या पुतळ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्ते हार अर्पण करुन रॅलीला सुरुवात करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजुने जेसीबीच्या सहाय्याने हाराने स्वागत करण्यात येत होते. तसेच संभाजी उद्यानपासून सभास्थळापर्यंत जागो-जागी स्वागत करण्यात येत होते. सर्वच धार्मियांच्या वतीने आज जालन्यात स्वागत करण्यात येत असल्याने शहरातील प्रत्येक मोठे रस्त्यापासून ते गल्लो-गल्लीत फक्त जरांगे-पाटील यांचे नावाने गजर होत होता. शहरातील प्रत्येक कॉलनी, गल्लो-गल्ली वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. याच दरम्यान पोलीसांचा मोठा ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेला आहे. जागो-जागी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी प्रत्येक धर्मातील नागरिक, सामाजिक संघटकांच्या वतीने नाष्टासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान दुपारनंतरही रॅली ही जुना जालना भागातच होती. या रॅलीदरम्यान एक मराठा कोटी मराठा, जय भवानी, जय शिवरायांचाच जय घोष ऐकू येत होता.