मनोज जरांगे यांची तब्येत खालावली रक्तदाब कमी, साखरेचे प्रमाणही घटले

उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला असून साखरेचे प्रमाणही घटले आहे. वैद्यकीय पथकाने तपासणी करून जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. परंतु जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला.

मराठा आरक्षण, सगे सोयर्‍यांचा अध्यादेश तसेच कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी १६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यात त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण घटल्याचे आढळून आले. जरांगे यांना कमालीचा अशक्तपणा आला असून वैद्यकीय पथकाने त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. परंतु जरांगे यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास नकार दिला.

राजरत्न आंबेडकर यांनी घेतली भेट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. जरांगे यांची प्रकृती खालावल्याचे पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा दिला. राजरत्न आंबेडकर यांच्या विनंतीला मान देऊन जरांगे यांनी वैद्यकीय तपासणीला होकार दिला.

ओबीसींचे दोन ठिकाणी उपोषण

ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी वडीगोद्रीत दोन ठिकाणी उपोषण सुरू झाले आहे. प्रा. लक्ष्मण हाके हे वडीगोद्रीत उपोषणाला बसले असून मनोज ससाणे हे आपल्या सहकार्‍यांसह आंतरवालीच्या वेशीवर उपोषण करत आहेत. आमची इच्छा नसतानाही केवळ सरकारच्या पक्षपाती धोरणामुळे आमच्यावर उपोषण करण्याची वेळ आल्याचा स्पष्ट आरोप प्रा. हाके यांनी केला. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुळात हे गॅझेट लागू करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे का, असा सवाल यावेळी प्रा. हाके यांनी केला. तर सरकारने सगेसोयर्‍यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करू नये असा इशारा मनोज ससाणे यांनी दिला. जर सरकारने कोणतेही गॅझेट लागू केले तर त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले.