मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची भावना समजून घेत नाहीत! मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची भावना समजून घेत नाहीत. देवेंद्र फडणवीस काही आमचे शत्रू नाहीत; परंतु ते काम देखील नीट करीत नाहीत. आम्हाला सहज घेताय. हिनविल्यासारखं बोलत आहेत. लोकशाहीत ते राजा आहेत, तुम्हाला लोकांची माया आली पाहिजे, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा आज आंतरवाली सराटीत पत्रकारांशी बोलताना टीका केली.

शेतकरी, धनगर बांधवांचे प्रश्न, ओबीसी बांधवांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत, मुस्लिम दलित लोकांसोबत तुम्ही तसेच वागणार हे योग्य नाही. वेळ आल्यास मग थातूरमातूर योजना काढून पुन्हा सत्तेवर बसणार. तुम्ही लोकांना वेड्यात काढताय हे लोकांना आता लक्षात येतंय, असे वक्तव्य करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. ओबीसीत मराठा आरक्षण असताना देखील ते आम्हाला आरक्षण देत नाहीत. अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे. मराठ्यांच्या विरोधात जाल तर तुमचा पक्ष संपून जाईल. देवेंद्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मराठा आरक्षणावर काम करू देत नाहीत, हैदराबाद येथील नोंदी का आणू देत नाहीत..? राग येणारच. तुम्ही मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मराठा आरक्षणावर काम करूच देत नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

गुन्हे मागे घ्यायचे तर ते गुन्हे वाढतच चालले आहेत. तर सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची देखील अंमलबजावणी केली जात नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. जातिवंत मराठा भाजप पक्षात राहणार नाही आणि एकाही माणसाला निवडून येऊ देणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. भाजपच्या आणि अजित पवार यांच्या गटातील लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना समजावून सांगावं, आरक्षण देऊन टाका नाहीतर राज्यातला खेळ सगळा बिघडून जाणार आहे. ज्यांना आपला नेता आणि पक्ष बाप वाटत आहे त्यांनी त्याला सांगावं, आरक्षण देऊन टाका. आम्ही त्यांच्यावर एक शब्दही बोलणार नाहीत आणि जर बोललो तर माझ्या कानाला धरा, असाही सल्लाही मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी दिला.