यूपीआय युजर्सला मिळणार कर्ज

सध्याच्या काळात लोक यूपीआयने पेमेंट करण्याला प्राधान्य देतात. अगदी चहाच्या टपरीपासून मॉलमध्ये आपण यूपीआयने पेमेंट करतो. येत्या काळात ही सुविधा आणखी मजबूत होणार आहे आणि बँका आपल्याला यूपीआयच्या माध्यमातून कर्ज देणार आहेत, अशी माहिती समोर आली.

देशातील अनेक बँकांनी यूपीआय अॅपवर ग्राहकांना कर्ज देण्याची योजना आखली आहे. बँक ग्राहकांना यूपीआय अॅपवर कर्ज देण्याची व्यवस्था करू शकते. अर्थात हे कर्ज मुदत ठेवी, एफडीच्या बदल्यात त्यांना मिळेल. म्हणजे तुमची बँकेत एफडी असेल तर ती तारण मानून बँक ग्राहकांना कर्ज देईल. त्यासाठी यूपीआय अॅपवर लोन ऑफर स्कीम सुरू करण्यात येऊ शकते. यूपीआय सेवांचे व्यवस्थापन करणाऱ्या राष्ट्रीय देयके महामंडळाने  याविषयीची अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही, पण व्रेडिट लाईन ऑन यूपीआय सर्व्हिस ही सुविधा देण्यात येऊ शकते.

दरम्यान, जुलै महिन्यात यूपीआयवरून तब्बल 1444 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. अवघ्या 30 दिवसात 2 हजार 64 कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली होती. दिवसेंदिवस ही देवाण-घेवाण वाढत असल्याने बँका हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

खासगी बँका देऊ शकतात ही ऑफर

 यूपीआयवर एफडीच्या बदल्यात कर्ज देण्याची सुविधा सर्वात अगोदर खासगी बँका सुरू करू शकतील. त्यासाठी त्यांना एनपीसीआयसोबत मिळून सध्याच्या यूपीआय व्यवस्थेत बदल करावा लागेल. असे समजतेय की, या सुविधेच्या मदतीने नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा खासगी बँकांचा हेतू आहे.