मनू भाकरचा डबल धमाका! सरबज्योत सिंगने कोरले ब्राँझ पदकावर हिंदुस्थानचे नाव

>> मंगेश वरवडेकर

नेमबाज मनू भाकरने रविवारी पराक्रम केला होता. तर आज इतिहास घडवला. तीन दिवसांत दुसरे पदक जिंकत मनूने अद्वितीय यशाची भेट अवघ्या हिंदुस्थानला दिली. तिने 10 मीटर एअर पिस्टलच्या मिश्र दुहेरीत सरबज्योत सिंगच्या साथीने ब्राँझ पदकाला गवसणी घालत पुन्हा एकदा हिंदुस्थानचे पदक स्वप्न साकारले. या पदकासह एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू पहिली हिंदुस्थानी खेळाडू ठरली.

मनू-सरबज्योतच्या यशानंतर हॉकीत आयर्लंडचा 2-0 ने फडशा पाडत बाद फेरीच्या दिशेने पावले टाकली. तिरंदाजीत भजन कौरने अचूक नेम लावत उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डीने इंडोनेशियन अल्फियान- अर्दियांतो जोडीचा 21-13, 21-13 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा विक्रम केला. टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रानेही जोरदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

नेमबाजीच्या सुखद बातमीनंतर हिंदुस्थानच्या खेळाडूंनी तिरंदाजी, बॅडमिंटन, हॉकी, टेबलटेनिस खेळातही जोरदार सुरुवात करत मनूच्या कामगिरीवर यशाचा कळस चढवला.