मनूचा कास्यवेध; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला पहिले पदक

>>  मंगेश वरवडेकर

22 वर्षीय मनूने सात वर्षांच्या कारकीर्दीत 50 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय तर 70 पेक्षा अधिक राष्ट्रीय पदके पटकावली आहेत. आशियाई स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल प्रकारात मनूने सुवर्णपदक पटकावले होते.

पॅरिसमध्ये भरलेल्या खेळांच्या महाकुंभमेळय़ात हिंदुस्थानचा तिरंगा दुसऱ्याच दिवशी डौलाने फडकू लागला आहे. टोकियोत स्वप्नभंग झालेल्या नेमबाज मनू भाकरने पॅरिसमध्ये आपले स्वप्न साकार करताना महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिसरे स्थान पटकावत कास्य पदकाचे चुंबन घेतले आणि इतिहास रचला.

ती नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली हिंदुस्थानी महिला ठरली आहे. कोरियाच्या ये जिन ओह (243.2 गुण) आणि येजी किम (241.3) यांनी सोनेरी आणि रुपेरी यश संपादले. मनू 221.7 गुणांसह कास्य पदकाची विजेती ठरली. तब्बल 12 वर्षांनंतर हिंदुस्थानच्या नेमबाजाला ऑलिम्पिक पदक जिंकता आले आहे. मनूच्या कास्यवेधाने यंदाच्या ऑलिम्पिकमधील पदकांचा श्रीगणेशा झाला आहे.

नेमबाजी सोडणार होती

टोकियोतील अपयशामुळे मनू निराश झाली होती. मुख्य स्पर्धेच्या वेळेलाच पिस्तुलात झालेल्या बिघाडामुळे तिला 44 पैकी 14 शॉट्सच मारता आले होते. त्यामुळे ती अंतिम शर्यतीतून आपोआपच बाहेर झाली होती. या कामगिरीमुळे खचलेल्या मनूने चक्क नेमबाजी सोडण्याचा विचारही केला होता. गेल्या वर्षी आशियाई स्पर्धेत ती सहभागी झाली होती, पण तिला या प्रकारात खेळता आले नव्हते. त्यामुळे तिच्या ऑलिम्पिक समावेशाबाबत साशंकता होती, पण तिने प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या सहकार्याने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात जोरदार कामगिरी करत ऑलिम्पिक कोटा मिळवला.

जर टोकियोत मला धडा मिळाला नसता तर मी आज इथे नसते. त्यामुळे टोकियोच्या अपयशानेच पॅरिसच्या यशाचा पाया रचला असे मी म्हणेन. आज मला माझे सर्वोत्तम द्यायचे होते. मला माझे कर्म करायचे होते. बाकी सर्व मी परमेश्वरावर सोडून दिले. कर्म कर, फल की चिंता न कर. माझ्या कर्माला पदकाचे भाग्य लाभले.

– मनू भाकर