मला अटक करून बघाच, मराठा काय असतो ते कळेल! मनोज जरांगे यांचे सरकारला आव्हान

आंतरवालीतील गुन्हे दोन दिवसांत मागे घेण्याचा शब्द सरकारने दिला होता. सरकार शब्द तर पाळत नाहीच उलट मराठा तरुणांना विनाकारण अटका होत आहेत. मलाही अटक होणार असल्याची चर्चा आहे. मला अटक करून बघाच, मराठा काय असतो ते कळेल, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी थेट राज्य सरकारला आव्हान दिले.

आंतरवाली सराटी येथून पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा तरुणांना झालेल्या अटकेवरून राज्य सरकारवर तुफान हल्ला चढवला. दोन दिवसांत गुन्हे मागे घेणार अशी ग्वाही दिली होती. परंतु सरकारने शब्द पाळला नाही. उलट आता मराठा तरुणांवर गुन्हा दाखल करण्याचा सपाटाच लावला आहे. मलाही अटक करणार असे बोलले जाते. अटक करा, कारागृहातही आमचे आंदोलन सुरूच राहील. पण सरकारला हा डाव अतिशय महागात पडेल असा स्पष्ट इशारा  जरांगे यांनी दिला. तसेच ज्यांच्याकडे निजामकालीन कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र का देण्यात येत नाही असा सवाल जरांगे यांनी केला. आमच्याशी दगाफटका करू नका, नाही तर गाठ मराठा समाजाशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

रॅली काढू नका

मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा टप्पा 1 डिसेंबरपासून सुरू झाला आहे. खान्देश, विदर्भ आणि मराठवाडय़ात ठिकठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत. सभेपूर्वी जंगी मिरवणुका, वाहन रॅली काढण्यात येत असल्यामुळे सभांना उशीर होत आहे. त्यामुळे रॅली, मिरवणुका बंद कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.