मराठा आरक्षणाचा विषय तसेच आमच्या इतर मागण्या तातडीने तडीस नेतो, असा शब्द सरकारने दिला आहे. त्यामुळेच मी सलाईन लावण्यास परवानगी दिली. पण सरकार उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. याद राखा, दिलेला शब्द फिरवाल तर सलाईन काढून टाकेन, असा खरमरीत इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी चौथ्यांदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकार दरबारी सुरू असलेल्या चालढकलीवर संताप व्यक्त केला. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे काल मध्यरात्री भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर काही मंत्र्यांशी बोलणे झाले. सरकारची भूमिका सकारात्मक वाटल्याने आपण सलाईन लावण्यासाठी परवानगी दिली. परंतु सरकारने शब्द फिरवला तर सलाईन काढून फेकून देईन, असे जरांगे म्हणाले. आम्हाला फक्त आरक्षणाशी देणेघेणे आहे. चर्चेतून मार्ग निघेल यावर विश्वास आहे. त्यामुळे सरकारनेही सहनशक्तीचा अंत बघू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले.
लोकसभेतील निकालावरून सरकार जर आमच्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर विधानसभेत यापेक्षाही वाईट हाल करेन, असा इशाराही या वेळी जरांगे यांनी दिला. छगन भुजबळ बधीर असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील, असे वाटते. पण त्यांचे ओएसडी कारस्थानी आहेत. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीयही या कारस्थानात सामील आहेत. आता ते लोकांना घेऊन दिल्लीला पळत आहेत. मराठय़ांना बदनाम करण्यासाठीच हे चालू असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. ओएसडीचे हे सर्व कारस्थान थोडय़ाच दिवसांत उघडे पडेल, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचा पाठिंबा
खासदार ओमराजे निंबाळकर यांना यावेळी महिला आंदोलकांनी साकडे घातले. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संसदेत किषय मांडा आणि प्रसंगी संसद बंद पाडा, अशी मागणी महिलांनी केली. त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सरकारला तोडगा काढण्यास भाग पाडण्यासाठी पूर्ण ताकदीने लढू, असे आश्वासन दिले. मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे परभणी येथील शिवसेना खासदार संजय जाधव यांनी जाहीर केले. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्यांसंदर्भात राज्य सरकारला सूचना देण्यासंदर्भात खासदार जाधव यांनी राज्यपालांनाही पत्र लिहिले आहे.
ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांची आज धाराशीवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मनोज जरांगे यांचे उपोषण न्याय्य हक्कासाठी असल्याचे सांगितले. मात्र प्रकृतीही महत्त्वाची असून त्यांनी पाणी घ्यावे, अशी विनंती त्यांना केल्याचे ओमराजे निंबाळकर म्हणाले. सरकारने या उपोषणाची तातडीने दखल घेऊन पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
कोणत्या मागण्या पूर्ण केल्या जाहीर सांगा
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या दहापैकी आठ मागण्या मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी आमच्या कोणत्या मागण्या सरकारने मंजूर केल्या ते जाहीर सांगावे, असे खुले आव्हान मनोज जरांगे यांनी दिले.