…तर पुन्हा उपोषणाला बसणार; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण संदर्भातील सगेसोयऱ्यांचा जो अध्यादेश काढण्यात आला आहे, त्याची उद्यापासून अंमलबजावणी सुरू करा अन्यथा 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीतून आमरण उपोषणाला सुरुवात करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी रायगड पायथ्यावरून दिला आहे.

मराठा आरक्षण संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी ही घोषणा केली आहे. आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, मात्र ती समिती काम करत नाही, असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला. मराठा आरक्षण संदर्भातील अनेक मागण्यांवर अध्यादेश जारी झाले आहेत. त्याला चार दिवस उलटून गेले तरी आंतरवालीसह महाराष्ट्रातील आंदोलकांवर दाखल केलेल्या केसेस अद्याप मागे घेतलेल्या नाहीत. हे गुन्हे तत्काळ आणि तातडीने मागे घेऊ असं आश्वासन शासनाने दिलं होतं, त्यामुळे हे गुन्हे 10 फेब्रुवारीच्या आत मागे घ्या, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

तसंच, शिंदे समितीने 1884 सालचं हैदराबाद गॅझेट स्वीकारू असं म्हटलं होतं. ते अजूनही स्वीकारण्यात आलेलं नाही. त्यामुळे ते तातडीने स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा दिला पाहिजे, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली आहे. ‘1884 हैदराबादचं गॅझेट स्विकारलेले नाही. ते स्वीकारुन त्याला शासकीय नोंदीचा दर्जा दिला पाहिजे. बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट स्विकारलेले नाही. 1884 ची जनगणना स्वीकारावी कारण शिंदे समितीकडे देणे अत्यंत आवश्यक आहे. 1902 चा दस्तावेज सुद्धा घेतला पाहिजे तोही घेतलेला नाही. ओबीसी आयोगाचा अहवाल जाणं सुद्धा गरजेचे आहे. सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबतची प्रक्रिया लगेच सुरू होणार असे सांगितले होते. अर्ज दाखल होऊन सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली नाही, असं जरांगे यावेळी म्हणाले.

‘सगेसोयरे ही राजपत्रित अधिसूचना टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश सगळ्यांनी मिळून काढलेला आहे त्याच्या सह्यांचं पत्र सुद्धा आमच्याकडे आहे. ते 10 तारखेला माध्यमांना देणार असल्याचंही जरांगे यावेळी म्हणाले. मराठा समाजाचा फायदा सोडून आपल्याला दुसरं काहीही नको. पुढे काय होईल काय नाही हे आम्हाला माहीत नाही. पण मी मराठा समाजाचा मुलगा म्हणून गोरगरीब मराठ्यांच्या पाठिशी खंबीर उभा राहणार आहे. प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही. कोणीही गैरसमज करून घ्यायची गरज नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आणि सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी 15 दिवसांच्या आत केल्याशिवाय मी थंड बसणार नाही. हा शब्द मी मराठ्यांना देतो’, असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.