…तर मराठे भाजपचा राजकीय एन्काऊंटर करतील – मनोज जरांगे

मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यासाठी सर्वस्वी देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा होती त्यांनीच आमच्या नरडय़ात विष ओतले आहे. त्यामुळे वेळ पडली तर मराठे भाजपचा राजकीय एन्काऊंटर करतील, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दिला.

जो समाज त्यांच्या बाजूने होता त्यांच्या लेकरांचे मुडदे देवेंद्र फडणवीस यांनी पाडले आहेत. फडणवीस यांच्या बाजूने असलेला मराठा 24 पॅरेटचा असूच शकत नाही. सत्तेतून जाता जाता फडणवीसांनी मराठय़ांच्या काळजावर वार केला. ओबीसीत नवीन जाती घालून गोरगरीबांचे आरक्षण कमी केले. त्यामुळे ही लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम लावणार, असे जरांगे-पाटील म्हणाले.

– लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजपचे पानिपत करणार असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मराठा मतांमुळे होणारी पडझड टाळण्यासाठी भाजपकडून जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले असून शुक्रवारी पहाटे 2.30 वाजता फडणवीसांचे अत्यंत विश्वासू राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जरांगे यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली.

मुंबई विमानतळ सहा तास ठप्प

पावसाळय़ानंतर धावपट्टीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. सहा तासांच्या या काळात अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. सहा महिने आधीच प्रवाशांना याबाबत सूचना देण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही.