…त्यांना आम्ही सरकार मानत नाही! मनोज जरांगे-पाटलांचा हल्लाबोल

आतापर्यंत त्यांनी मौन धरले होते. आता त्यांचे पोटातले ओठावर येत आहे. आम्हाला वाटले ते आपल्या पाठीशी असतील. दहा-पाच सोडले तर त्यांनी करोडो मराठा तरुणांवर अन्याय केला आहे. ते अपघाताने सत्तेत आले आहेत. आमच्याविरोधात बोलून ते सरकार असल्याचे दाखवत आहेत. मात्र अपघाताने सत्तेत आलेल्या अजित पवारांना आम्ही सरकार मानत नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे-पाटील यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषणाचे आंदोलन करणार आहेत. त्यासाठी 20 जानेवारीला ते अंतरवलीहून मुंबईकडे कूच करणार आहेत. रविवारी गेवराई तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणी कायदा मोडणार असेल तर कारवाई करू, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे-पाटील म्हणाले, कायदा मोडला तर कारवाई करा, तुमच्या कारवाईला मराठे शांततेत उत्तर देतील. आम्हाला वाटले होते अजित पवार मराठा समाजाच्या पाठीशी आहेत. पण पोटातले आज ओठावर आले असे जरांगे म्हणाले.

करोडो मराठय़ांवर अन्याय
पाच-दहा जण सोडले तर अजित पवारांनी करोडो मराठय़ांवर अन्यायच केला. मराठय़ांच्या विरोधात बोलून आपण सरकार असल्याचे दाखवत आहेत. मात्र ते अपघाताने सत्तेत आले आहेत. त्यांना आपण सरकार मानत नाही. आम्ही मुंबईत जाणार, आमच्या न्याय्य मागणीसाठी आंदोलन करणार, काय कारवाई करायची आहे ती करू द्या, मराठे शांततेत उत्तर देतील, असे म्हणत मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.