वादग्रस्त व्हिडिओ खरा असेल तर सरकारला खूप महागात पडेल! मनोज जरांगे यांचा स्पष्ट इशारा

सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेअगोदर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या संवादाचा व्हायरल व्हिडिओ खरा असेल तर सरकारला हे खूपच महागात पडेल, असा स्पष्ट इशारा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मंत्रिमंडळासह मनोज जरांगे यांच्या भेटीला येणार होते. परंतु, व्हायरल व्हिडिओमुळे संतप्त पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन हा दौराच रद्द करण्यात आला. यासंदर्भात मनोज जरांगे यांना विचारले असता त्यांनी व्हायरल व्हिडिओ खरा असेल तर सरकारला खूपच महाग पडेल, असा स्पष्ट इशारा दिला. बोलून मोकळे व्हायचे की काय करायचे, हे आम्ही पाहू. इच्छा नसतानाही सरकारला महिनाभराचा वेळ दिला आहे. त्यामुळे अशी विधाने कुणीही करू नये, असेही जरांगे यांनी बजावले.

मुख्यमंत्री येणार असतील तर त्यांचे स्वागतच असेही जरांगे म्हणाले. महिनाभरात आरक्षण मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले तर ही जागा सोडणार का, असे विचारले असता मनोज जरांगे यांनी स्पष्ट नाही असे सांगितले.
एवढी फेकाफेकी मी बघितली नाही.

मुख्यमंत्री येणार असे म्हणतात. मीडियाकडूनच हे कळले. पण त्याची कोणतीही खात्रीलायक माहिती माझ्याकडे नाही. सायंकाळी अर्जुन खोतकर हे ‘घेऊन येतो’ असे सांगून निघून गेले. कुणाला घेऊन येतो हे मात्र त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे कोण येणार हे कळले नाही. मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरतो, पुन्हा रद्द होतो. काय चाललेय तेच कळत नाही. एवढी फेकाफेकी मी बघितली नाही, असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला.