सगेसोयरे यांनाही मिळणार कुणबी जात प्रमाणपत्र; 16 फेब्रुवारीपर्यंत मागविल्या हरकती व सूचना

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष मागास प्रवर्ग विभागाकडून जात प्रमाणपत्र व पडताळणीच्या नियमावलीत ‘सगेसोयरे’ या शब्दाचा अंतर्भाव करून प्रारूप अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या प्रारूप अधिसूचनेवर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱयांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱयांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील. ही अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील. असे राज्य सरकारने जारी केलेल्या प्रारुप अधिसूचनेत नमूद केले आहेत.

राज्य सरकारच्या मसुद्यात नेमके काय म्हटले आहे?
– सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढय़ांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल.

– कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत. अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱयांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल.

– कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.

– ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगेसोयरे म्हणजे, मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल. तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.

– कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱयांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल, मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे यासंदर्भातील पुरावा देणे तथा गृहचौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हेदेखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.