मणिपूरमधील हिंसाचारामुळे विद्यार्थी खवळले; राज्यपाल, डीजीपी, निष्क्रिय आमदारांच्या राजीनाम्याची मागणी

मणिपूरमधील ताज्या हिंसाचारात गेल्या काही दिवसांत आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रविवारपासून हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. हिंसाचारामुळे शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे खवळलेल्या विद्यार्थ्यांनी आज राज्यपाल, पोलिस महासंचालक आणि सर्व निष्क्रिय आमदारांनी राजीनामे द्यावेत यासाठी मणिपूर सचिवालय आणि राजभवनासमोर उग्र निदर्शने केली.

राज्यात हिंसाचाराच्या नव्या लाटेत ड्रोनद्वारे झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये 8 मृत्यू आणि 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. याचाच निषेध करण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मणिपूर लाँग लिव्ह, सर्व निष्क्रिय आमदारांनी राजीनामा द्या आणि राज्य सरकारला युनिफाइड कमांड द्या अशा घोषणा देत निदर्शने केली.

आम्हाला अभ्यास करू दे

आंदोलकांपैकी काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि राज्यपाल एल आचार्य यांचीही भेट घेतली. आम्हाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय मुक्तपणे अभ्यास करायचा आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याची विनंती केली, असे महाविद्यालयीन विद्यार्थी एम. सनाथोई चानू यांनी पत्रकारांना सांगितले. थौबल जिह्यात, गणवेशातील विद्यार्थ्यांनी राज्याच्या प्रादेशिक आणि प्रशासकीय अखंडतेची हमी आणि कोणत्याही प्रकारच्या स्वतंत्र प्रशासनाला विरोध करत रॅली काढली.

विद्यार्थ्यांच्या सहा मागण्या  

मणिपूरमधील हिंसाचार आटोक्यात आणण्यात अपयशी ठरलेले पोलीस महासंचालक आणि राज्य सरकारच्या सुरक्षा सल्लागार यांना हटवण्यासह या विद्यार्थ्यांनी सहा मागण्या केल्या आहेत. हिंसाचार रोखण्यासाठी गृह खात्याच्या नियंत्रणाखाली असलेली विविध सुरक्षा यंत्रणांची युनिफाइड कमांड माजी सीआरपीएफ महासंचालक पुलदीप सिंग यांच्याकडे सोपवण्याची मागणी त्यांनी केली. रविवारी, राज्य सरकारनेही राज्यपालांकडे हीच मागणी केली होती.

विद्यार्थ्यांची राजभवनावर चाल

आज राज्य सचिवालय आणि राजभवनावरही शेकडो विद्यार्थी चालून गेले होते. या आंदोलकांनी राजभवनाच्या मुख्य दरवाजावर दगडफेक केली. यावेळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱयांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत. या वेळी त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. मणिपूर स्टुडंट्स युनियनच्या विद्यार्थ्यांनी इंफाळमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक केली.