मणिपूरमध्ये पुन्हा उद्रेक; 4 जणांची हत्या, इम्फाळमध्ये संचारबंदी

मणिपूरमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हिंसाचाराचा उद्रेक झाला असून, थौबल जिह्यातील लिलोंग येथे सोमवारी संध्याकाळी चार जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हिंसाचारात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. थौबल, इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, काकचिंग आणि विष्णूपूर जिह्यांमध्ये पुन्हा संचारबंदी जारी करण्यात आली आहे.

खंडणीवसुलीसाठी स्वयंचलित शस्त्र घेऊन आलेल्या एका टोळक्याने लिलोंग (जि. थौबल) येथे हा गोळीबार केल्याचे स्थानकांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी शांततेचे आवाहन केले असून सर्व मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची एक तातडीची बैठक या हिंसाचारानंतर बोलावली आहे. गेल्या वर्षभरात वांशिक हिंसाचारात होरपळणाया मणिपूरमध्ये 180 हून अधिक लोक मारले गेले असून, सुमारे 60 हजार लोक विस्थापित झाले आहेत.

तीन वाहने पेटवली
सैनिकी वेषात आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे भडकलेल्या स्थानिक नागरिकांनी तीन चारचाकी वाहने पेटवून दिली. अज्ञात हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही.