मणिपूरमध्ये आणखी 5 दिवस मोबाईल इंटरनेट बंद, 5 हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांमध्ये बंदोबस्त वाढवला

मणिपूरमधील 5 हिंसाचारग्रस्त जिह्यांमध्ये मोबाइल इंटरनेटवर आणखी पाच दिवस बंदी घालण्यात आली आहे. इंफाळ पश्चिम, पूर्व, थौबल, बिष्णुपुर आणि काकचिंग येथील लोकांना 20 सप्टेंबरपर्यंत मोबाइल इंटरनेटचा वापर करता येणार नाही. पाच हिंसाचारग्रस्त जिह्यांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मणिपूरमध्ये अचानक हिंसाचाराच्या घटना वाढल्यानंतर राज्य सरकारने 10 सप्टेंबर रोजी 5 दिवसांसाठी इंटरनेट बंद केले होते. 12 सस्टेंबर रोजी ब्रॉडबँड इंटरनेटवरील बंदी हटवण्यात आली होती. परंतु, हिंसाचार थांबत नसल्याचे पाहून राज्य सरकारने आणखी पाच दिवस मोबाइल इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 15 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 20 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ही इंटरनेट बंदी असणार आहे. दरम्यान, बंडखोरांनी मंत्री काशिम वशुम यांच्या अखरुल येथील घरावर ग्रॅनेड हल्ला केला. या घटनेत पुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

पहाटे 5 ते दुपारी 12 पर्यंत संचारबंदी शिथील सर्वसामान्य नागरिकांना औषधांसह जिवनावश्यक वस्तुंची खरेदी करता यावी यासाठी पहाटे 5 ते दुपारी 12 दरम्यान संचारबंदी शिथील करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलातील अधिकाऱयांनी दिली. दुपारी 12 वाजल्यानंतर राज्यभरातील हिंसाचारग्रस्त जिह्यांत पुन्हा संचारबंदी लागू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थी आक्रमक झाल्याने हिंसाचारग्रस्त जिह्यांमध्ये संचारबंदी लागू केली होती.