गणेशोत्सव संपला, आता ‘आनंदाचा शिधा’ वाटप सुरू

तालुक्यातील 106 स्वस्त धान्य दुकानांमधून 20 हजार 669 कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ किटवाटपास नुकताच प्रारंभ झाला आहे. दरम्यान, हा शिधा गौरी-गणपतीच्या सणाचा असल्याचे सांगण्यात आले. नुकताच प्राप्त झालेला शिधा हा केवळ 84 टक्के मिळाल्याने सर्व कार्डधारकांना पुरेल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाने गोरगरिबांना विविध सणांच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून स्वस्त दरात आनंदाचा शिधा वाटप करण्याचे धोरण निश्तिच केले असून, त्याप्रमाणे यंदा गौरी-गणपतीच्या सणाला आनंदाचा शिधा देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्याप्रमाणे हा शिधा सणाऐवजी सण झाल्यानंतर वाटप होत असल्याने कार्डधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामध्ये अंत्योदय कार्डधारक 2 हजार 987, तर प्राधान्य कार्डधारक 17 हजार 682 असून यांना 4 वस्तू मिळणार आहेत. या किटमध्ये सोयाबीन तेल 1 लिटर, साखर 1 किलो, रवा 1 किलो, चनाडाळ 1 किलो हे शंभर रुपयांमध्ये कार्डधारकांना मिळत आहे.

सध्या आलेले किट केवळ 84 टक्के मिळाल्याने सर्व कार्डधारकांना हे किटस मिळतील की नाही अशी शंका व्यक्त होत आहे. तोंडावर दसरा व दिवाळीचा सण येत असल्याने आचारसंहिता घोषित झाल्यास या सणालाही हे किटस मिळण्याची साशंकता व्यक्त केली जात आहे. शासनाने योग्य नियोजन करून सणाच्या तोंडावर हे किटस वाटप केल्यानंतर त्याचा लाभ कार्डधारकांना योग्य वेळी घेता येणार असल्याच्या प्रतिक्रिया कार्डधारकांमधून व्यक्त होत आहेत.

दरम्यान, ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानातून कार्डधारकांना योग्य रीतीने किटचे वाटप होते की नाही यावर पुरवठा निरीक्षक हणमंत पाटील, अव्वल कारकून मीनाक्षी हजारे लक्ष ठेवून आहेत.