मंचर – साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवरीच्या कुटुंबीयांचे दागिणे चोरट्यांनी पळवले

साखरपुडा व टिळाच्या कार्यक्रमात अज्ञात चोरट्याने मुलीच्या घरच्यांनी कार्यक्रमासाठी आणलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोबाईल असे एकूण तब्बल तीन लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे,ही घटना काल दि.३ रोजी अवसरी बुद्रुक येथे घडली आहे.

याप्रकरणी गणेश संभाजी खालकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशोदीप मंगल कार्यालय येथे गणेश संभाजी खालकर (रा. जवळे ता. आंबेगाव जि. पुणे.) यांच्या मुलीच्या साखरपुडा व टिळाच्या कार्यक्रम होता. या कार्यक्रमात नवरदेव मुलाला ओवाळण्यासाठी फिर्यादी यांची पत्नी गेली असता जवळील पर्स तेथे असणाऱ्या खुर्ची ठेवली होती ओवाळणी झाल्यावर पर्स घेण्यासाठी सदर महिला गेली असता त्या ठिकाणाहून पर्स कुणीतरी घेऊन गेलेले आढळले. त्यांनी कार्यालयात शोध घेतला असता कुठेच आढळून आली नाही. या पर्समध्ये कार्यक्रमासाठी फिर्यादीने आणलेली 1,42.884 रुपये किंमतीची सोन्याची चैन, 38 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, 1900 रुपये किंमतीचे मुलीच्या पायातील चांदीचे पैजन, एक लाख सात हजार रुपये रोख, पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल व ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अज्ञात चोरट्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बीट जमादार तानाजी हगवणे करत आहे.

सध्या ग्रामीण भागात सर्वत्र लग्न व साखरपुडा समारंभ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे कार्यालय मालकांनी आपल्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसून घ्यावेत, अनेक ठिकाणी चोरटे हे उंची पोशाख घालून अशा कार्यक्रमा मध्ये फिरत असतात. उंची पोशाखामुळे त्यांना कोणी हटकत नाही, मात्र ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांनी आलेले पै, पाहुणे, नातेवाईक, सगेसोयरे, मित्र परिवार आपल्या ओळखीचेच आहेत का याची खबरदारी घ्यावी. व मौल्यवान वस्तू व्यवस्थित ठेवाव्यात असे आवाहन मंचर सहाय्यक निरीक्षक सोमशेखर शेटे यांनी केले आहे.