मिठी मारून लग्नासाठी पळून जाण्याचा केला आग्रह, हायकोर्टाने आरोपीला दिले अटकेपासून संरक्षण; पीडितेने नोंदवला विनयभंगाचा गुन्हा

अल्पवयीन मुलीला मिठी मारून लग्नासाठी पळून जाण्याची विनवणी करणाऱ्या आरोपीला उच्च न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपीने पीडितेला कोणतेही आमीष दाखवण्याचा प्रयत्न करू नये, असा सज्जड दमही न्यायालयाने दिला आहे.

पीडिता व आरोपीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. चार महिने ते एकमेकांच्या संपर्कात होते. घटनेच्या दिवशी आरोपी पीडितेच्या घराजवळ गेला. त्याने तेथे तिला मिठी मारली व लग्न करण्यासाठी पळून जाण्याची विनवणी केली. पीडितेने पोलिसांत याची तक्रार केली. पोलिसांनी विनयभंग व पॉक्सोअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. यात होणारी अटक टाळण्यासाठी आरोपी सुधीर जाधवने न्यायालयात अर्ज केला.

न्या. मनीष पितळे यांच्या एकल पीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. पीडितेची बाजू मांडण्यासाठी वकिलाची नेमणूक होत नाही तोपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी विनंती जाधवकडून करण्यात आली. पीडितेला तातडीने वकील देण्याचे आदेश न्या. पितळे यांनी लिगल एड सेलला दिले व जाधवला 50 हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. यावरील पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे.

न्यायालयाचे निरीक्षण

पीडिता जाधवकडे आकर्षित झाली होती. अशा परिस्थितीत तिची संमती गौण ठरते. पण ज्या परिस्थितीत तिने विनयभंगाचा आरोप केले आहेत ते बघता जाधवला कठोर अटी टाकून अटकपूर्व जामीन मंजूर करायला हवा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. जाधवने पोलीस तपासात सहकार्य करावे. पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा अटी न्यायालयाने जाधवला घातल्या आहेत.