फायनान्स कंपनीच्या छळाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले

एमएएस फायनान्स कंपनीच्या छळाला कंटाळून 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथमेश देसाई असे मृत तरुणाचे नाव आहे. फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी उरण पोलिसांकडे केली आहे.

उरण तालुक्यातील करंजा-सुरकीचा पाडा येथे देसाई कुटुंब राहतात. आई वृषाली एका खासगी शाळेत कर्मचारी आहे, तर वडील विलास वृत्तपत्र विक्रेते आहेत. त्यांचा मोठा मुलगा गणपती कारखान्यात आणि प्रथमेश खासगी बंदरात काम करीत होता. वृषाली यांनी प्रथमेशला एमएएस फायनान्स सर्व्हिस या कंपनीतून लोन घेऊन दुचाकी घेतली. 2022 मध्ये घेतलेल्या गाडीचे 16 हप्तेही नियमित भरले. त्यानंतरचे शिल्लक राहिलेले काही हप्ते थकले होते. त्यामुळे फायनान्स कंपनीचे एजंट फोन करून हप्त्यासाठी प्रथमेशकडे सारखा तगादा लावत होते. तसेच सतत घरी अपमानित करून धमकी देत होते. या छळाला कंटाळून प्रथमेशने आत्महत्या केली. तरुणाच्या नातेवाईकांनी उरणच्या पोलीस ठाण्यात एमएएस फायनान्स सर्व्हिस कंपनीविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली.